राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना एक पत्र लिहून डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करण्याची विनंती केली आहे. या पत्रात त्यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत परखड मत मांडले असून, विधेयकाला पाठिंबा देण्यामागे कोणाचा दबाव आहे, असा सवाल उपस्थित करत एक खळबळजनक दावा केला आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?
पक्षातील काही खासदार आणि आमदार सत्ताधारी बाजूने जाण्याचा विचार करत आहेत किंवा काहींना तसे करण्यास भाग पाडले जात आहे, त्यामुळे त्यांचा दबाव येणे स्वाभाविक असल्याचे रोहित पवार यांनी पत्रात म्हटले आहे. ज्यांना जायचे असेल त्यांनी खुशाल जावे, त्यांचे खरे चेहरेही समोर येतील, असे त्यांनी नमूद केले आहे. गद्दारी करणाऱ्या आमदार-खासदारांना स्वाभिमानी जनता पुन्हा कधीही निवडून देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे सुप्रिया सुळे यांनाही त्यासाठी जबाबदार धरले जात असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, या सगळ्यामागे असलेला पक्षातीलच एक नेता शांतपणे बसला असून सुळे यांची प्रतिमा मात्र खराब होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्या नेत्याचा उल्लेख त्यांनी पक्षातील भाजपचा हस्तक असा केला आहे.
शरद पवारांच्या प्रतिमेची चिंता
शरद पवार आजारी असताना त्यांच्या मागे घेतले जाणारे निर्णय त्यांच्या आयुष्यभराच्या तपाला बाधा पोहोचवू नयेत, ही आपली अत्यंत प्रामाणिक भावना असल्याचे रोहित पवार यांनी पत्रात म्हटले आहे. शरद पवार यांच्या निष्ठेवर आणि पुरोगामी प्रतिमेवर कोणताही डाग लागू न देण्याची जबाबदारी आज सर्वांच्याच खांद्यावर असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यातील भावना आपण पाहिली असून त्यांच्या मनातही हाच विचार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. मात्र त्यांच्यावर दबाव येत असावा, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा