चाकण: दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाला उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, चाकण येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक घटल्याने बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. वाटाणा, टोमॅटो, गवार आदींच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. असे असले तरी नवी मुंबई आणि कोकणातील खरेदीदारांच्या गर्दीमुळे बाजारपेठ गजबजली आहे. यामुळे उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
वाटाणा २०० रुपये किलोपर्यंत
स्थानिक भागातून होणारी फळभाज्या व पालेभाज्यांची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यामुळे भाव वाढले आहेत, असे बाजार समितीचे सभापती अशोक राक्षे व सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले. विशेषतः हिरवा वाटाणा परराज्यातून येत असून त्याचे घाऊक दर १०० ते १२५ रुपये, तर किरकोळ दर २०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. चाकण बाजार हा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र व कोकणासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. सध्या विहिरींची पाणीपातळी घटल्याने आणि सिंचनाच्या टंचाईमुळे स्थानिक भाजीपाल्याची लागवड कमी झाली आहे. परिणामी, पहाटेपासूनच बाजारात व्यापारी आणि वाहनांची वर्दळ असली तरी मालाची उपलब्धता मर्यादित आहे. परराज्यातून येणाऱ्या फळभाज्यांवरच सध्या बाजाराची मदार आहे.
शेतकऱ्यांना फायदा नाही, ग्राहकांना महागाई
पाऊस नसल्याने उत्पादन घटले आहे. भाव वाढले असले तरी शेतकऱ्यांकडे मालच नसल्याने त्यांचा फायदा होत नाही, उलट ग्राहकांना महागडा भाजीपाला खरेदी करावा लागत आहे, असे स्थानिक शेतकरी विशाल पऱ्हाड यांनी सांगितले. बाजारभाव (प्रतिकिलो, रुपयांत) पुढीलप्रमाणे: टोमॅटो घाऊक २० ते ३०, किरकोळ ४०; भेंडी घाऊक २० ते ५०, किरकोळ ८०; गवार घाऊक ६० ते ७०, किरकोळ १००; दोडका घाऊक ४० ते ५०, किरकोळ ८०; हिरवी मिरची घाऊक ६०, किरकोळ ८० ते १००; दुधी भोपळा घाऊक ४० ते ५०, किरकोळ ६०; काकडी घाऊक ४०, किरकोळ ६०; कारली घाऊक ४० ते ५०, किरकोळ ८०; मेथीची एक जुडी घाऊक १५ ते २०, किरकोळ ३०; कोथिंबीर एक जुडी घाऊक १५ ते २०, किरकोळ ३०.
Leave a Reply