बीड जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आधीच भीषण आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा कठीण काळात आधार ठरू शकणाऱ्या राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागील दोन हप्ते अद्याप रखडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे चार लाख शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
केंद्राचे पैसे आले, राज्याचा निधी रखडला
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. मात्र राज्य सरकारकडून मिळणारा निधी अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये देते. त्याच धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करून वर्षाला अतिरिक्त सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातात. मात्र बीड जिल्ह्यातील सुमारे चार लाख शेतकऱ्यांचे मागील दोन हप्ते अजूनही जमा झालेले नाहीत. यंदा अपुऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापूस आणि तूर यांसारख्या मुख्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
निधी थेट खात्यात जमा होणार
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर त्याच पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेचा निधी थेट राज्य शासनाच्या पातळीवरून पात्र शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केला जातो. यामध्ये स्थानिक पातळीवरून निधी वितरणात कोणताही हस्तक्षेप नसतो. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, राज्य स्तरावरून तांत्रिक व निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण होताच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर हे प्रलंबित हप्ते थेट जमा होतील.
यंदा पावसाअभावी सोयाबीन आणि कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. हातात पैसा नसल्याने घरखर्च कसा चालवायचा, हा मोठा प्रश्न असल्याचे शेतकरी अशोक पवार यांनी सांगितले. केंद्राचे पीएम किसानचे पैसे आले, पण राज्य सरकारच्या नमो योजनेचे दोन हप्ते अद्याप आलेले नाहीत. या रकमेतून कुटुंबाचा महिनाभराचा खर्च कसाबसा भागतो. त्यामुळे ऐन दुष्काळी संकटात सरकारने हा निधी तातडीने खात्यावर जमा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Leave a Reply