भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड तालुक्याच्या पश्चिम भागात यंदा भात कापणीला वेग आला आहे. हंगामाच्या सुरुवातीला चांगल्या उत्पन्नाची आशा शेतकऱ्यांना होती. मात्र ओंब्या लगडण्याच्या निर्णायक टप्प्यात पाऊस थांबल्याने पिकांची अवस्था बिकट झाली आणि उत्पन्नात मोठी घट होणार असल्याचे चित्र समोर आले आहे.
चिखलगाव येथील शेतकरी बाळासाहेब गोपाळे आणि ज्ञानदेव गोपाळे यांनी या परिस्थितीबद्दल माहिती दिली. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात यंदा जवळपास ३१५० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती. पाण्याच्या कमतरतेमुळे ओंब्यांनी लगडलेल्या पिकाला पावसाचा फटका बसला आणि ओंब्यांमध्ये दाणेच भरले नाहीत. त्यामुळे भाताचे पीक वाळून गेले.
रोगराईमुळेही पिकाची वाढ खुंटली
पिकाच्या वाढीच्या काळात करपा रोग आणि अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाची वाढ खुंटली. मर रोगाच्या प्रादुर्भावानेही उत्पन्नावर परिणाम झाला. या सर्व कारणांमुळे यंदा उत्पन्नात ५० ते ६० टक्के घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
प्रगतशील शेतकरी बाळासाहेब गोपाळे म्हणाले की, पावसाअभावी माळरानावरील भातपिके पूर्णपणे जळून गेली असून भाताचा पेंढाही शिल्लक राहिलेला नाही. कृत्रिम पद्धतीने पाणी देऊन काही भातपिके जगवण्यात आली. मात्र त्यातूनही पन्नास टक्के उत्पन्नात घट झाली आहे. शासनाने तातडीने नुकसान भरपाई देऊन बळीराजाला जगवले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
वर्षभराचे बजेट कोलमडले
भाताच्या पिकापासून यंदा चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा असताना पावसाअभावी पिके जळून गेल्याने शेतकऱ्यांचे वर्षभराचे बजेट कोलमडले आहे. जनावरांसाठी भाताचा पेंढाही मिळणार नसल्याची चिंता शेतकरी ज्ञानदेव गोपाळे यांनी व्यक्त केली.
Leave a Reply