जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती एकत्रितपणे मैदानात उतरणार हे आता निश्चित झाले आहे. महायुतीतर्फे एकूण २१ जागा लढवल्या जाणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. मात्र मुक्ताईनगर, चोपडा आणि बोदवड या जागांवर अद्याप निर्णय झालेला नाही. या जागांवरील वाद दोन दिवसांत मिटेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मुक्ताईनगरच्या जागेवरून वाद
मुक्ताईनगर तालुक्यात दोन जागा आहेत. मुक्ताईनगर आणि बोदवड या जागांवरून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात वाद पेटण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जलसंपदामंत्री महाजन, पालकमंत्री पाटील, मंत्री संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांची बैठक झाली. या बैठकीत महायुतीतर्फे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुक्ताईनगरची जागा भाजपला सोडावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. मात्र त्याच जागेवर आमदार पाटील यांचाही दावा असल्याने कोण माघार घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चोपडा, भडगाव आणि बोदवड येथील जागांबाबतही निर्णय बाकी असून, माघारीनंतर तेथील चित्र स्पष्ट होईल.
पाचोरा समीकरणात बदल; महाविकास आघाडीचे सात उमेदवार
दरम्यान, पाचोरा मतदारसंघातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमीत पाटील यांचा उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरवण्यात आला होता. तो अर्ज आता अपिलात वैध ठरवण्यात आला आहे. नाशिक विभागीय सहनिबंधकांनी सुनावणीनंतर हा निर्णय दिल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा चुरस निर्माण झाली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने सात ते आठ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष जमील शेख यांनी सांगितले की, काँग्रेसचे पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतील. महाविकास आघाडीतील इतर घटक सोबत येणार नसतील, तर काँग्रेस स्वतंत्रपणे लढेल, असा इशाराही देण्यात आला आहे. माघारीसाठी आता १६ आणि १७ या दोनच तारखा उरल्या असून, या काळात कोण माघार घेते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
Leave a Reply