नाशिकमध्ये ऋतुमानात बदल होऊन वातावरणातील गारठ्याचे प्रमाण वाढत आहे. शनिवारी (१४ नोव्हेंबर) नाशिकमध्ये हंगामातील नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली. या दिवशी नाशिकचे किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअस, तर निफाडचे तापमान ११.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. विशेष म्हणजे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरपेक्षा जास्त गारवा सध्या नाशिकमध्ये जाणवतो.
राज्यातील नीचांकी तापमान
शनिवारी महाबळेश्वरचे किमान तापमान १५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. राज्यात नीचांकी किमान तापमानाची नोंद यवतमाळ येथे झाली असून, तेथील पारा १२.४ अंश सेल्सिअस नोंदविला गेला. सायंकाळच्या वेळी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवते. त्यामुळे नागरिकांनी आतापासून हिवाळी कपडे काढण्याची तयारी सुरू केली आहे.
निफाडमध्ये सर्वाधिक गारठा
जिल्ह्यात सर्वाधिक गारठा निफाड तालुक्यात नोंदविला जातो. यंदाच्या हंगामात निफाडमध्ये गेल्या बुधवारी (११ नोव्हेंबर) हंगामातील नीचांकी १०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर येथील पारा किरकोळ प्रमाणात वाढला होता. शनिवारी निफाडचे किमान तापमान ११.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. असे असले तरी डिसेंबर उजाडण्यापूर्वी पारा दहा अंशांपेक्षा खाली घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नाशिकमध्ये पाऱ्याची घसरण सुरूच असून, शनिवारी किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. एकीकडे किमान तापमानात घट झाली असताना, दुसरीकडे कमाल तापमानात मात्र मोठी वाढ झाली आहे. सध्या कमाल तापमान ३० अंशांपेक्षा जास्तवर पोहोचले असून, शनिवारी ३१.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दिवसाच्या वेळी कडक ऊन आणि सायंकाळनंतर वातावरणात गारठा जाणवत असल्याने अशा मिश्र वातावरणात आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
Leave a Reply