लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी निलंगा तालुक्यातील १३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत निलंग्यात प्रतिष्ठेची लढत होत असून कोण जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत तालुक्यातील विविध सहकारी संस्थांच्या मतदारसंघांतील मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विशेषतः विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील अरविंद पाटील निलंगेकर विरुद्ध संगीता पाटील निलंगेकर यांच्यातील थेट लढतीने निवडणुकीत रंगत निर्माण केली आहे.
१३७ मतदार बजावणार हक्क
निलंगा तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघात सर्वाधिक ९९ मतदार आहेत. या मतदारसंघातून भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात विद्यमान संचालक अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी संगीता पाटील निलंगेकर यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात दोन उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे. कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या लढतीने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. दोन्ही बाजूंनी मतदारांपर्यंत पोचण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले असून, मतदानाच्या दिवशी मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
तालुक्यात नागरी सहकारी पतसंस्था मतदारसंघात २५, मजूर सहकारी संस्था मतदारसंघात नऊ, मत्स्य सहकारी संस्था मतदारसंघात तीन, तर मार्केटिंग व प्रक्रिया उद्योग मतदारसंघात एक मतदार असे एकूण १३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदान केंद्रांभोवती प्रतिबंधात्मक आदेश
मतदानप्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी मतदान केंद्रांच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी सहापासून मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असेल. या क्षेत्रातील राजकीय पक्षांची कार्यालये, मंडप आणि दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत. फेरीवाले, खासगी वाहने तसेच मोबाइल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावरही निर्बंध असतील. ध्वनिक्षेपकांचा वापर, वाद्य वाजविणे आणि मिरवणुका काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. इतर व्यक्तींना वैध ओळखपत्राशिवाय मतदान केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.
Leave a Reply