रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

दिवाळी सुट्टीत खासगी वाहनांतून पर्यटनाला जोर

दिवाळी संपताच सुट्ट्यांमध्ये देवदर्शन व पर्यटनाचे वेध लागले आहेत. नागरिक खासगी वाहनांतून पर्यटन स्थळे गाठत असून, वाहनचालकांच्या व्यवसायाला चालना मिळाली आहे.

दिवाळी सुट्टीत खासगी वाहनांतून पर्यटनाला जोर

दीपोत्सवाचा सण संपताच अनेकांना सुट्ट्यांमध्ये देवदर्शन व पर्यटनाचे वेध लागले आहेत. आठवड्यापासून विविध देवस्थानासह इतर राज्यांतील पर्यटन स्थळांवर नागरिकांची गर्दी होत आहे. दिवाळीच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करत नागरिक खासगी वाहनातून पर्यटन स्थळे गाठत आहेत. पर्यटन नियोजनामुळे खासगी वाहनचालकांच्या व्यवसायाला चांगली चालना मिळाली आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अनेक कुटुंबीय पर्यटनाचा आनंद घेत आहेत. शासकीय नोकरदार, व्यावसायिक, मित्र परिवार, महिला आणि मुले सुट्टीच्या निमित्ताने एकत्र येऊन विरुंगुळ्यासाठी विविध लहान-मोठ्या पर्यटन व धार्मिक स्थळांना भेटी देऊन आनंद साजरा करीत आहेत. परिणामी सर्वच रस्त्यांवरचे दळणवळण वाढले आहे. धार्मिक व पर्यटन स्थळी खासगी वाहनांची रेलचेल आहे.

कोणती स्थळे पसंतीस?

सुट्टीमुळे अनेक जण सप्तशृंगी गड, सापुतारा, शिर्डी, शनिशिंगणापूर, पेरूची वाडी नाशिक, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, शेगाव, अक्कलकोट, पुणे, कोल्हापूर, पावागड, मांगीतुंगी, गणपती पुळे, अष्टविनायक आणि कोकण दर्शन आदी ठिकाणी भेटी देऊन देवदर्शन व पर्यटनाचा आनंद घेत आहेत.

भाडेदर आणि वाहनांची मागणी

सुट्टीमुळे खासगी वाहने ९ ते १४ रुपये किलोमीटर दराप्रमाणे भाडे आकारीत आहेत. शहरातील टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडून वाहने उपलब्ध करून दिली जात आहेत. खासकरून क्रुझर, इर्टिका, तवेरा, इनोव्हा आणि मिनी व्हॅन आदी भाडेतत्त्वाच्या वाहनांना चांगली मागणी आहे. दर किलोमीटरप्रमाणे कार ११ रुपये, क्रुझर १६ ते १७ रुपये, इर्टिका १४ रुपये, तवेरा १५ ते १६ रुपये, मिनी ट्रॅव्हल व्हॅन २५ ते २७ रुपये आणि इनोव्हा २० ते २२ रुपये भाडे आकारले जात आहे. दिवाळीच्या सुट्टीत नागरिक पर्यटन स्थळे, मंदिरे, गड आणि किल्ल्यांना भेटी देत आहेत. वैयक्तिक संपर्कातून प्रवासी भाडे मिळत असून, नागरिकांची खासगी वाहनांना जास्त पसंती मिळत आहे, असे मालेगावातील एका खासगी वाहनचालकाने सांगितले.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance