अजित पवार यांचा घातपात झाल्याचा संशय किंवा त्याबाबतचा पुरावा रामदास कदम यांच्याकडे होता, तर सर्वप्रथम गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदार अनिल पाटील यांनी केली आहे.
रामदास कदम यांच्याकडे एवढी माहिती होती किंवा सुनील तटकरे यांचा घातपातामध्ये हात असल्याचा पुरावा त्यांच्याकडे असेल, तर योगेश कदम हेच त्यांच्या घरातील गृहमंत्री आहेत, असे पाटील म्हणाले. पुरावे घरातच असूनही ते सीबीआय किंवा अन्य यंत्रणांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली नसेल, तर आधी योगेश कदम यांचाच राजीनामा घेतला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
रामदास कदम यांनाही पाटलांचा सल्ला
पुरावे रामदास कदम यांच्याकडे असतील आणि ते यंत्रणांपर्यंत पोहोचू दिले नसतील, तर रामदास कदम यांनी आधी आपल्या मुलाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही पाटील यांनी केली. योगेश कदम यांनी कर्तव्यात कसूर करून गोपनीयतेचा भंग केला आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्यास हरकत नाही, असेही ते म्हणाले. त्यांच्याकडे जे पुरावे असतील ते सादर केले पाहिजेत, असेही पाटील म्हणाले.
विलीनीकरणाची चर्चा फक्त माध्यमांमध्ये
दरम्यान, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आमदार शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे वृत्त पाटील यांनी फेटाळले. विलीनीकरणाची चर्चा फक्त माध्यमांमध्ये सुरू असून, भेटीबाबतचे वृत्त निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पार्थ पवार यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली होती, असेही पाटील म्हणाले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply