यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे नाशिक विभागातील खरीप हंगाम मोठ्या प्रमाणावर करपला. कांदा, द्राक्ष, केळी, मका, गहू, भात आणि सोयाबीन यांसारख्या प्रमुख पिकांसह इतर पिकांनाही पावसाअभावी फटका बसला. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळी सणापूर्वी दिलासा देण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर ही रक्कम जमा होत आहे.
नाशिक विभागातील दुष्काळग्रस्त ५२ तालुक्यांमधील १८ लाख ७ हजार ३२ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर आतापर्यंत ९०३ कोटी ५२ लाख रुपये जमा झाले आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ४ लाख १७ हजार ६४९ शेतकऱ्यांना २०८ कोटी ८२ लाख रुपयांची मदत मिळाली आहे. या मदतीमुळे शेतकरी कुटुंबांना सणाच्या काळात काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
जिल्हानिहाय मदतीचा तपशील
अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक ८ लाख ७ हजार २८४ शेतकऱ्यांना ४०३ कोटी ६४ लाख रुपये मिळाले. जळगाव जिल्ह्यातील ४ लाख ८ हजार ६३५ शेतकऱ्यांच्या खात्यावर २०४ कोटी ३२ लाख रुपये जमा झाले. धुळे जिल्ह्यात ६५ हजार ९३० शेतकऱ्यांना ३२ कोटी ९७ लाख रुपये, तर नंदुरबार जिल्ह्यात १ लाख ७ हजार ५३४ शेतकऱ्यांना ५३ कोटी ७७ लाख रुपयांची मदत देण्यात आली.
नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय लाभार्थींची संख्या अशी आहे — मालेगाव ७१ हजार ४७८, निफाड ५५ हजार २४५, येवला ५१ हजार ६३७, बागलाण ४९ हजार १०७, सिन्नर ४७ हजार १६६, नांदगाव ३५ हजार ५७२, चांदवड २४ हजार ७०८, देवळा २२ हजार ५४६, कळवण १९ हजार ५४५, इगतपुरी १४ हजार ३३९, सुरगाणा १० हजार ३४१, त्र्यंबकेश्वर ९ हजार १४८ आणि पेठ ६ हजार ८१७.
बँकांना कर्जवसुली न करण्याचे आदेश
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्व बँकांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, या अग्रिम मदतीतून तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या अनुदानातून कोणत्याही प्रकारची कर्जवसुली करू नये. आदेशाचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply