धुळे जिल्ह्यात यंदा पावसाने शेतकऱ्यांची मोठी निराशा केली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणी झाल्यानंतरही पाऊस थांबल्याने कोरडवाहू भागातील कापसाचे पीक हातचे गेले. दिवाळी येण्यापूर्वीच अनेक शेतकऱ्यांनी नांगर फिरवून उभे पीक जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे. सणाच्या तोंडावर शेतात हिरव्या पिकाऐवजी ओसाड शिवार दिसत आहे.
धुळे, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू कापसाची लागवड होते. जून आणि जुलै महिन्यात पेरण्या झाल्या. मात्र ऑगस्टनंतर पाऊस जवळजवळ थांबला. दीड ते दोन महिन्यांच्या खंडामुळे झाडे सुकून गेली, बोंडे फुलली नाहीत आणि फुले गळून पडली. कापडणे परिसरातही हीच स्थिती आहे.
उत्पादनात मोठी घट
एका एकरातून दहा ते बारा क्विंटल कापूस मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात एक-दोन क्विंटल कापूसही हाती लागला नाही. वेचणीसाठी मजूर लावले तरी त्यांचा खर्चही निघणार नाही, हे लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी कापूस उपटून टाकण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी ट्रॅक्टरने रोटाव्हेटर आणि नांगर फिरवून शेत मोकळे केले आहे.
खर्च पाण्यात, कर्जाचा भार
बियाणे, खते, औषधे आणि मजुरी यासाठी शेतकऱ्यांनी एकरी पंधरा ते वीस हजार रुपयांहून अधिक खर्च केला होता. तो सगळा खर्च वाया गेला आहे. सावकाराचे आणि बँकेचे कर्ज कसे फेडायचे, दिवाळी कशी साजरी करायची आणि पैसा कुठून आणायचा, असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत.
शासनाची मदत आणि शेतकऱ्यांची अपेक्षा
दिलासा देणारी बाब म्हणजे शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे. कर्जमाफीही जाहीर झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जमा होत आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना काहीसा आधार मिळाला आहे. मात्र झालेल्या नुकसानीच्या तुलनेत पाच हजार रुपये पुरेसे नाहीत, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. पीकविमा मिळाल्यास रब्बी हंगामासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोठा आधार मिळेल, असे शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष आत्माराम पाटील यांनी म्हटले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply