दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जाहीर करण्यात आलेली अग्रिम मदत माळमाथा भागातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा झालेली नाही. दिवाळीसारखा मोठा सण आला, तरी शासनाकडून जाहीर झालेली मदत खात्यात जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे जमा केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली असली, तरी माळमाथा भागातील अनेक शेतकरी अद्याप प्रतीक्षेत आहेत.
ई-केवायसीची अट शिथिल, तरीही मदत रखडली
१ नोव्हेंबर २०२५ पासून आजपर्यंत विविध शासकीय योजनांसाठी ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा ई-केवायसी करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. वनपट्टाधारक शेतकऱ्यांना अद्याप अॅग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक मिळालेला नसल्यास केवळ ई-केवायसीच्या आधारे मदत वितरित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
मात्र, फॉर्मर आयडी उपलब्ध असतानाही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे मदत वितरणाच्या प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकरी ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे चौकशी करीत आहेत, मात्र त्यांनाही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेली ही मदत दिवाळीपूर्वी खात्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र सण निघून गेल्यानंतरही रक्कम न मिळाल्याने बळीराजाची अग्रिम मदतीची प्रतीक्षा कायम आहे. मदत वितरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply