सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

दिवाळीच्या सुट्ट्या अन् मामाचं गाव: बालपणीचा आनंद हरवला

१९९० च्या दशकातील दिवाळी म्हणजे मामाचं गाव, मातीचं अंगण आणि मैदानी खेळांचा आनंद होता. आज साधने वाढली असली तरी बालपणीचा तो निरागस आनंद कुठेतरी हरवला आहे.

दिवाळीच्या सुट्ट्या अन् मामाचं गाव: बालपणीचा आनंद हरवला

दिवाळी म्हटली की डोळ्यांसमोर उभे राहते ते बालपणीचे निरागस जग. मातीच्या घराचे सारवलेले अंगण, फराळाचा दरवळ, मामाच्या गावाला जाण्याची लगबग, मित्रांसोबत फोडलेले फटाके आणि संध्याकाळपर्यंत रंगणारे मैदानी खेळ — १९९० च्या दशकातील दिवाळीचा आनंद काही वेगळाच होता. आज २०२६ मध्ये दिवाळीचा सण तितक्याच उत्साहाने साजरा होत असला, तरी त्या काळातील बालपण कुठेतरी हरवल्याची भावना मनात घर करून जाते.

मामाच्या गावाला जाण्याची लगबग

१९९० च्या दशकात दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की मुलांच्या आनंदाला पारावार राहत नसे. शाळेला सुट्ट्या लागण्यापूर्वीच मामाच्या गावाला जाण्याची तयारी सुरू व्हायची. गावापासून तीन ते चार किलोमीटर पायी चालत बसस्थानक गाठावे लागायचे. तिथे पोचल्यानंतर तासनतास बसची वाट पाहावी लागायची. कधी बस वेळेवर यायची, तर कधी बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागायचे. मात्र, बस दिसताच चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असायचा. बसमध्ये जागा मिळाली की मामाच्या गावाकडे निघाल्याचा आनंद गगनात मावेनासा व्हायचा.

दिवाळीत मामाच्या गावाला जायचे असल्याने घरातील तयारीलाही वेग यायचा. त्या काळात अनेकांची घरे मातीची असायची. दिवाळीपूर्वी घर सारवण्यासाठी आईची धावपळ सुरू व्हायची. गडीवरून माती आणणे आणि घरासमोरची जागा स्वच्छ करणे अशी छोटी-मोठी कामे मुलेही आनंदाने करायची. घर सारवताना ओल्या मातीचा दरवळ संपूर्ण घरात पसरायचा. तो सुगंध आजही आठवणींच्या कप्प्यात ताजा आहे.

मामाच्या घरी पोचताच मामाची मुले आणि गल्लीतील मित्र आनंदाने जवळ यायचे. मामाकडून टिकल्या, सुरसुऱ्या आणि लवंगी फटाके आणले जायचे. एकेक फटका जपून फोडताना होणारा आनंद शब्दांत सांगता येणार नाही. फटाक्यांचा आवाज, धुराचे लोट आणि मुलांचा किलबिलाट यामुळे संपूर्ण गल्ली दिवाळीच्या उत्साहात न्हाऊन निघायची. मामाच्या गावात नवीन मित्र जोडले जायचे आणि तिथे तयार झालेली मैत्री पुढच्या भेटीची आतुरता वाढवायची.

खेळ आणि बदललेले दिवस

त्या काळात मुलांना खेळण्यासाठी मोबाइल किंवा महागड्या खेळण्यांची गरज नव्हती. गल्लीतील मित्र एकत्र आले की खेळांची मैफल रंगायची. सुरपारंब्या, लपाछपी, विटीदांडू, गोट्या असे पारंपरिक खेळ खेळण्यात संध्याकाळ कधी व्हायची, हे कळतही नसे. झाडांच्या फांद्यांवर चढणे, लपण्यासाठी जागा शोधणे, विटीदांडू खेळताना होणारे वाद आणि पुन्हा काही क्षणांत एकत्र येणे, यातच बालपणाचा खरा आनंद सामावलेला होता. संध्याकाळ झाली की घरातून आईची हाक यायची; पण खेळात रंगलेल्या मुलांना घरी परतण्याची इच्छाच होत नसे.

दरम्यान, काळ बदलला. तंत्रज्ञान पुढे गेले, दळणवळणाची साधने वाढली. पूर्वी मामाच्या गावाला जाण्यासाठी पायी चालत बसस्थानक गाठावे लागायचे; आज वाहनांची सोय आहे. पूर्वी मामाच्या घरी पोचल्यावर प्रत्यक्ष भेटीतून नाती घट्ट व्हायची; आज मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून संवाद साधला जातो. मात्र, या सोयी वाढताना नात्यांमधील प्रत्यक्ष भेटीचा जिव्हाळा काहीसा कमी झाल्याची खंत अनेकांना जाणवते. दिवाळीच्या सुट्यामध्ये मामाच्या गावातील मित्रांसोबत मैदानी खेळ खेळले जायचे. आता अनेक मुलांच्या हातात मोबाइल आले आहेत. मोबाईलवरील खेळांमध्ये रमलेली मुले अनेकदा घरातच वेळ घालवतात. त्यामुळे एकत्र खेळण्याची, मित्रांसोबत मस्ती करण्याची आणि नाती जपण्याची सवय कमी होत असल्याचे चित्र दिसते.

१९९० च्या दशकातील दिवाळी आणि २०२६ मधील दिवाळी यामध्ये मोठा बदल झाला आहे. त्या काळात साध्या गोष्टींमध्ये मोठा आनंद होता. मामाच्या गावाला जाण्यासाठी केलेला पायी प्रवास, बसची वाट पाहण्याची उत्सुकता, मातीच्या घराचा सुगंध, मामाच्या गावातील मित्रांची साथ, फटाक्यांची आतषबाजी आणि मैदानी खेळ यांची सर आजच्या डिजिटल मनोरंजनाला येणार नाही. आजही दिवाळी आली की बालपणीच्या त्या आठवणी मनात फेर धरतात. मामाचे गाव, तेथील मित्र, अंगणातले खेळ आणि आईच्या हातची माया आठवते. काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या, काही माणसे दुरावली, काही मित्र संपर्काबाहेर गेले; पण त्या आठवणी मात्र मनाच्या कोपऱ्यात जपून राहिल्या आहेत. खरंच, त्या काळी साधने कमी होती; पण आनंद भरपूर होता. आज साधने भरपूर आहेत; मात्र तो निरागस आनंद कुठेतरी हरवला आहे. — अरुण ठोंबरे, केदारखेडा

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance