दिवाळीच्या सुट्यांमुळे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे. सातपूर, अंबड, गोंदेगाव आणि सिन्नर येथील औद्योगिक वसाहतींमध्ये कामानिमित्त आलेले परराज्यांतील कामगार, कर्मचारी आणि व्यावसायिक कुटुंबासह गावी रवाना होत आहेत. त्यामुळे उत्तर भारताकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या प्रवाशांनी खचाखच भरून धावत आहेत.
विशेष गाड्यांनाही मोठा प्रतिसाद
दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, अमृतसर आणि हरिद्वारकडे जाणाऱ्या गाड्यांना सर्वाधिक गर्दी आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने काही विशेष गाड्या सुरू केल्या असल्या तरी त्यांनाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. परिणामी गाड्यांमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागत आहे.
अनेक गाड्या रात्री उशिरा किंवा मध्यरात्री येत असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह आलेल्या प्रवाशांना स्थानकाबाहेर दीर्घ प्रतीक्षा करावी लागते. स्थानकातील प्रतीक्षागृह आणि फलाटांवर गर्दी असल्याने अनेकांनी बाहेरच ठाण मांडले आहे. दिवाळीच्या सलग सुट्यांचा लाभ घेत अनेकांनी धार्मिक आणि पर्यटनस्थळांकडे जाण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे नियमित गाड्यांसह विशेष गाड्याही फुल्ल झाल्या आहेत. काही प्रवासी गर्दीमुळे रेल्वेच्या दरवाजाला लटकून प्रवास करण्याचा धोका पत्करत आहेत. अशा प्रवाशांना रेल्वे सुरक्षा बलाचे जवान खाली उतरवून सुरक्षित प्रवासाचे आवाहन करीत आहेत.
भुसावळ विभागाकडून ८२ विशेष गाड्या
दिवाळी आणि छठपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने व्यापक उपाययोजना केल्या आहेत. विभागातून ८२ हून अधिक विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या असून नाशिकरोड, मनमाड आणि भुसावळ या प्रमुख स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, तिकीट तपासनीस आणि वाणिज्य पर्यवेक्षक तैनात करण्यात आले आहेत. मुंबई आणि पुणे येथून नागपूर, गोरखपूर, दरभंगा, बनारस आणि दानापूरसह विविध शहरांसाठी विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. अमरावती-उधना आणि अमरावती-पुणे या विशेष गाड्यांचाही त्यात समावेश आहे. स्थानकांवरील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात चोवीस तास कर्मचारी तैनात आहेत. याशिवाय विभागीय स्तरावर २४ तास कार्यरत वॉर रूम स्थापन करण्यात आला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply