भुसावळ येथे मराठी रंगभूमी दिनानिमित्त ‘शहरातील प्रायोगिक हौशी नाट्य चळवळी पुढील आव्हाने’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. शहरातील नाहाटा महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहात झालेल्या या परिसंवादात मराठी नाटकांची समृद्ध परंपरा नव्या पिढीने जपणे आवश्यक आहे, असा सूर उमटला.
परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक होते. भुसावळमधील सर्व नाट्य संस्था व कलावंत यांनी एकत्रितरित्या या परिसंवादाचे आयोजन केले होते.
वक्त्यांचे विचार
परिसंवादात स्नेहयात्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील, उत्कर्ष कलाविष्कारचे अध्यक्ष अनिल कोष्टी, माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, नाट्य रसिक मनोहर जाधवानी आणि आनंद सपकाळे यांनी सहभाग घेऊन स्थानिक पातळीवर नाट्य चळवळीमधील समस्यांवर प्रकाश टाकला. नवीन पिढीने नाटक माध्यमाकडे सकारात्मक दृष्टीने बघून सर्व अडचणींवर मात करून आपल्या मराठी नाटकांची समृद्ध परंपरा जपणे आवश्यक आहे, असा आशावादी सूर सर्व वक्त्यांच्या भाषणांमधून व्यक्त झाला.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी आणि डॉ. विकास कोळंबे यांची विशेष उपस्थिती होती. रंगकर्मी कुंदन तावडे यांनी नांदीचे सादरीकरण केले. यावेळी विद्यापीठस्तरावर झालेल्या सांस्कृतिक महोत्सवात विविध कला प्रकारात विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुशील पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर आनंद सपकाळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कलाविष्कारचे सचिव धर्मराज देवकर, प्रबोध भावे, राजेंद्र जावळे, कुंदन तावडे, उमेश गोरधे, हारून उस्मानी, मनोहर झांबरे, युवराज कुरकुरे, नारायण माळी, धनराज कुवर, रवींद्र कोळी, चेतन चौधरी, रिया कोल्हे, वैष्णवी बाविस्कर, प्रेरणा देशमुख व नाट्य रसिक उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply