पिंपरी चिंचवड महापालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी ३० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी दिवाळीनिमित्त विशेष बाब म्हणून हे अनुदान देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी ही माहिती दिली.
महापालिकेत १९९७ पासून घंटागाडी कर्मचारी आरोग्य विभागांतर्गत कचरा संकलनाची सेवा पुरवीत आहेत. त्यांना २००६ पासून दिवाळीनिमित्त विशेष बक्षीस दिले जात आहे. महापालिका कर्मचारी महासंघ आणि घंटागाडी कंत्राटदारांनी २०२५-२०२६ साठी दिवाळीनिमित्त विशेष बाब म्हणून बक्षीस देण्याची विनंती केली होती. त्यानुसार आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दोन नोव्हेंबरला प्रत्येकी ३० हजार रुपये देण्यास मान्यता दिली होती. त्या प्रस्तावास स्थायी समितीनेही मंजुरी दिली आहे.
कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची दखल
कचरा गोळा करून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी घंटागाडी कर्मचारी अहोरात्र पार पाडत आहेत. त्यांच्या मेहनतीची दखल घेऊन सणासुदीला आर्थिक आधार देणे आवश्यक होते. त्यामुळे ३० हजार रुपयांचे दिवाळी बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आशा स्वयंसेविकांनाही भत्ता
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेत झोपडपट्टी व झोपडपट्टीसदृश भागासाठी गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांना कामावर आधारित मोबदला दिला जातो. महापालिकेत कार्यरत स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय स्थायी समिती सभेने घेतला आहे. त्यासाठी सप्टेंबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ हा कालावधी गृहीत धरला आहे. या कालावधीत किमान सहा महिने अर्थात १८० दिवस कामकाज केलेल्या स्वयंसेविकांना भत्त्याचा लाभ मिळणार आहे. याअंतर्गत किमान सात हजार आणि कमाल १५ हजार रुपये मिळणार आहेत. हा खर्च वैद्यकीय विभागाकडील कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत ‘बोनस तथा सानुग्रह अनुदान’ या लेखाशिर्षातून केला जाणार आहे.
तसेच, नियमित मानधन घेऊनही महापालिकेच्या विरोधात खटले लढवणाऱ्या वकिलांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यांना आतापर्यंत दिलेले मानधन परत घेतले जाणार आहे. महापालिकेच्या पॅनेलवरील वकिलांनी आतापर्यंत महापालिकेच्या बाजूने किती खटले लढवले आणि किती जिंकले, याचा सविस्तर लेखाजोखा प्रशासनाकडून मागवला आहे. वकिलांच्या कामगिरीची संपूर्ण माहिती मिळेपर्यंत त्यांच्या मानधनाचा विषय प्रलंबित ठेवण्यात आला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply