संगमनेर तालुक्यातील सोनोशी गावात सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले हरिभाऊ कारभारी गिते यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाचे शिखर गाठले. विद्यार्थी सहायक समितीच्या कमवा आणि शिका योजनेच्या मदतीने त्यांनी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही शिक्षणाची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे त्यांनी परिस्थितीसमोर हार मानली नाही.
शासकीय सेवेतला प्रवास
२००१-०२ मध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. २००३-०४ मध्ये एका कंपनीत काम करताना पुणे-सातारा चारपदरी महामार्गाच्या कामात त्यांनी योगदान दिले. २००५ ते २००८ या काळात पुण्यातील राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. त्यानंतर अमरावती गृह व क्षेत्रविकास मंडळात उपअभियंता म्हणून जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून जलसंपदा विभागात सहायक अभियंता श्रेणी-१ म्हणून त्यांची निवड झाली. सहायक अभियंत्यापासून अधीक्षक अभियंतापदापर्यंतचा त्यांचा प्रवास मेहनत, अभ्यास, शिस्त आणि कार्यनिष्ठेचा वस्तुपाठ ठरला आहे.
महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये काम करताना त्यांनी नावीन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम राबवून अभियंत्यांच्या कौशल्यविकासाला चालना दिली. मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (मेरी) येथे उपसा सिंचन योजनांच्या संकल्पचित्रांच्या कामात त्यांनी योगदान दिले. नाशिक आणि अकोला जिल्ह्यांत जलसंधारण अधिकारी म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. सध्या नाशिक विभागाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत.
धरणाचे काम आणि शेतीशी नाळ
इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाच्या निर्मितीत सहायक अभियंता म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. धरणाच्या कामादरम्यान भूमिपुत्रांची आंदोलने, पुनर्वसनाचे प्रश्न, मोबदल्याच्या मागण्या आणि पाण्याच्या वाटपावरून निर्माण होणारे वाद अशा अनेक आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागले. व्यापक दृष्टिकोन, संवादकौशल्य आणि समन्वयाच्या माध्यमातून त्यांनी या प्रश्नांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. आजही अनेक नागरिक विविध प्रश्नांवर त्यांचे मार्गदर्शन घेतात.
शासकीय जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडतानाच त्यांनी लेखन आणि ज्ञानदानाचा वसा जपला आहे. एमपीएससी आणि यूपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी ६० हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. सरळसेवा वर्ग-१ अभियांत्रिकी अधिकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. तत्कालीन जलसंधारणमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. अभियांत्रिकी क्षेत्रात मोठे पद भूषवतानाही त्यांनी शेतीशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. सोनोशी येथील सुमारे ३० एकर डोंगराळ जमिनीवर नियोजन आणि प्रयोगशीलतेच्या जोरावर त्यांनी शेतीत उल्लेखनीय काम उभे केले. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि विषमुक्त अन्नासाठी सक्षम व शाश्वत शेती आवश्यक असल्याचा त्यांचा आग्रह आहे. आई सुमनबाई यांचे आशीर्वाद, पत्नी इंजि. जयश्री पालवे यांची साथ आणि कुटुंबाचे पाठबळ यामुळेच समाजासाठी अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे ते मानतात.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply