दीड वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘कमळी’ मालिकेत आता मोठा बदल होणार आहे. कमळीचा साधा लूक, दोन वेण्या आणि साधे कपडे यांची प्रेक्षकांमध्ये नेहमीच चर्चा असायची. अनेक चाहत्यांनी तिचा लूक बदलण्याची मागणीही केली होती. अखेर प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण होणार असून दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कमळी नव्या रूपात समोर येणार आहे.
अन्नपूर्णा आजी करणार नातीचा मेकओव्हर
भूतकाळातील सत्य समोर आल्यानंतर कमळी ही महाजन कुटुंबाची मोठी नात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अन्नपूर्णा आजी आपल्या लाडक्या नातीचा मेकओव्हर करणार आहेत. नव्या लूकमध्ये कमळीचे मोकळे केस, कपाळावरील चंद्रकोर, नाजूक कानातले आणि सुंदर ड्रेस असा खास अंदाज पाहायला मिळणार आहे. केवळ कमळीच नव्हे, तर तिची आई गौरी हिचाही लूक बदललेला दिसणार आहे. त्यामुळे मायलेकींचा हा नवा अंदाज प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.
लग्नाची तयारी आणि कबड्डीचे स्वप्न
मालिकेचा नवा प्रोमो वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पानावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये कमळीचा बदललेला लूक पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आता कमळी आणि हृषीच्या लग्नसोहळ्याची तयारीही सुरू झाली आहे. मात्र, या आनंदाच्या क्षणी मालिकेत एक अनपेक्षित वळण येणार आहे.
लग्नसोहळ्यादरम्यान कमळी कबड्डीच्या स्पर्धेसाठी जाण्याचा निर्णय घेते. आपल्या स्वप्नांसाठी ती भर लग्नातून निघून जाण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी हृषी तिला अडवतो आणि लपून जाण्याची गरज नसल्याचे सांगत तिच्या स्वप्नांना पाठिंबा देतो. स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी जाताना लपून का जातेस, गड जिंकून ये, मी इथेच तुझी वाट बघेन, असे तो तिला सांगतो. हृषीने दिलेल्या या साथीमुळे कमळीला आपल्या स्वप्नांच्या दिशेने पुढचे पाऊल टाकण्याचे बळ मिळणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply