ठाण्यात वेध अॅक्टिंग अकॅडमी आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सहयोग मंदिर येथे रोटरी वेध-भेट कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मनोविकारतज्ज्ञ डॉ. नंदकुमार मुलमुले यांनी पालकांना मार्गदर्शन केले. भारती सहस्रबुद्धे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमाची सुरुवात बालनाट्य, एकपात्री प्रयोग आणि गीतांच्या सादरीकरणाने झाली. रोटरी क्लबच्या अध्यक्ष अश्विनी वाडिया, सचिव केदार पटवर्धन आणि वेध अकॅडमीच्या अदिती ओक या वेळी उपस्थित होत्या.
स्क्रीनचे व्यसन वाढतेय, परिणाम एकाग्रतेवर
मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये स्क्रीनच्या व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. त्याचा परिणाम त्यांच्या एकाग्रतेवर, सर्जनशीलतेवर आणि भावनिक विकासावर होत आहे, असे डॉ. मुलमुले यांनी सांगितले. रील्स आणि सतत बदलणाऱ्या डिजिटल आशयामुळे मुलांची एकाग्रता कमी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
निर्बंध नव्हे, संवाद आणि खेळ हाच उपाय
मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी केवळ निर्बंध घालून उपयोग नाही, तर त्यांच्याशी संवाद साधणे, खेळण्यासाठी वेळ देणे आणि पालकांनी स्वतःच्या मोबाईल वापरावर मर्यादा आणणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत आहे. तीन वर्षांपर्यंतच्या मुलांना स्क्रीन दाखवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुलांच्या आयुष्यात खेळाला पहिले प्राधान्य असले पाहिजे, मात्र बागा आणि मैदाने कमी होत असल्याने मुलांचा मोबाईलकडे कल वाढत आहे. मुलांना काही वेळ कंटाळा येऊ देणेही गरजेचे आहे, कारण त्यातूनच त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सर्जनशील विचारांना चालना मिळते. जेवताना, कुटुंबासोबत वेळ घालवताना आणि झोपण्यापूर्वी पालकांनीही मोबाईल वापरणे टाळावे, कारण पालकांच्या वर्तनाचेच अनुकरण मुले करतात.
मुलांना नाट्यकला, संगीत आणि खेळ अशा उपक्रमांकडे वळवण्याचे आवाहन त्यांनी केले. पालकत्वासाठी कनेक्शन, डायरेक्शन आणि करेक्शन हे तीन टप्पे महत्त्वाचे असल्याचे सांगताना त्यांनी मुलांशी विश्वासाचे नाते निर्माण करण्यावर भर दिला. मुलांना प्रत्येक अडचणीपासून वाचवण्याऐवजी परिस्थितीचा सामना करण्यास शिकवावे, इतर मुलांशी तुलना करण्यापेक्षा त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करावे, केवळ गुणांपेक्षा विषयांची आवड आणि शिकण्याचा आनंद महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी सांगितले. मुलांशी संवाद साधताना सकारात्मक विधानांना प्राधान्य देऊन सौम्य भाषेत समजावून सांगावे, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply