महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा आणि पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त तथा आयोगाचे सदस्य सचिव डॉ. शामकांत पाटील यांनी नाशिकच्या मुक्त विद्यापीठाला भेट दिली. या भेटीत त्यांनी प्रस्तावित देशी गोसंगोपन व प्रशिक्षण केंद्राच्या आराखड्याची पाहणी केली.
देशी गोवंशाचे संवर्धन, शास्त्रीय पद्धतीने संगोपन तसेच पशुपालकांना आधुनिक पशुपालनाचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये हे केंद्र उभारण्यात येणार आहे.
कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे काम
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनानुसार या प्रकल्पाचे काम प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाला भेट देऊन प्रकल्पाच्या नियोजनाबाबत आवश्यक मार्गदर्शन केले.
या प्रकल्पाच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धन आणि शास्त्रीय गोसंगोपनाला प्रोत्साहन मिळेल. या दृष्टीने महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून प्रकल्पाला आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन आयोगाचे अध्यक्ष मुंदडा आणि सदस्य सचिव डॉ. शामकांत पाटील यांनी दिले. या वेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुरेंद्र पाटोळे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. नितीन ठोके, पशुसंवर्धन शास्त्रज्ञ डॉ. श्याम पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply