वर्षातील सर्वात मोठा सण जवळ आला असताना नाशिक शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग शिगेला पोहोचली आहे. व्यापारातील मंदी दूर होताना दिसत असून, ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वच विभागांत जाणवत आहे.
शहरातील मेन रोड, शिवाजी रोड, शालिमार आणि दहीपूल या भागांत तयार कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. रविवार कारंजा आणि अशोकस्तंभ परिसरात पूजा साहित्य खरेदीची धावपळ दिसते. रांगोळी, विविध साचे, घरांचे तोरण आणि विद्युत रोषणाईची साधने यांसारख्या सजावटीच्या वस्तूही मोठ्या प्रमाणावर घेतल्या जात आहेत.
सोन्याच्या दरातील घसरणीमुळे खरेदीला चालना
आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांत सोन्याचे दर काही प्रमाणात खाली आले आहेत. सणासुदीच्या काळात सोने स्वस्त झाल्याने ग्राहकांना खरेदीची चांगली संधी मिळाली आहे, असे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनापासून पाडव्यापर्यंत सराफी दुकानांमध्ये गर्दी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ई-वाहने आणि सुकामेव्याची मागणी वाढली
दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आगाऊ नोंदणी झाली असून, शुभ मुहूर्तावर वाहने घरी नेण्याचे नियोजन ग्राहकांनी केले आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांकडे खरेदीदारांचा ओढा वाढत असल्याचे जाणकारांनी नोंदवले आहे. भेटवस्तूंसाठी मिठाईचे अनेक पर्याय उपलब्ध असून, नामांकित दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. सुकामेव्यालाही चांगला भाव मिळत असून, पुढील आठवडाभर त्याची मागणी कायम राहण्याचा अंदाज आहे. सणाचा अंदाज घेऊन व्यावसायिकांनी अतिरिक्त माल भरला आहे. येत्या आठ-दहा दिवसांत शहरात हजारो कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल होण्याचा अंदाज आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply