शेतीशी संबंधित शासकीय योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यात पारदर्शकता राहावी, यासाठी राज्यात अॅग्रीस्टॅक ही डिजिटल व्यवस्था राबवली जात आहे. या व्यवस्थेअंतर्गत राज्यातील १.४४ कोटी शेतकऱ्यांना स्वतंत्र डिजिटल ओळख क्रमांक, म्हणजेच फार्मर आयडी देण्यात आला आहे. मात्र, अजूनही काही लाख शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार झालेला नाही. ज्यांची नोंदणी बाकी आहे, त्यांनी ती पूर्ण केल्यास दुष्काळी अग्रिम मदत आणि इतर योजनांचे अनुदान त्यांना तातडीने मिळू शकेल.
फार्मर आयडी का गरजेचा आहे?
गेल्या वर्षी १५ एप्रिलपासून कृषीविषयक शासकीय योजनांसाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला आहे. अॅग्रीस्टॅकमुळे शेतकरी आणि त्यांच्या जमिनीची आधारसंलग्न माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होते. त्यामुळे लाभ वितरणात पारदर्शकता आली असून कागदी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. पीकविमा, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, कृषी पायाभूत सुविधा निधी आणि शेती विकासासाठीच्या कर्ज योजनांमध्ये या डिजिटल नोंदणीचा उपयोग होतो. दुष्काळ अथवा अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठीही आता फार्मर आयडी मागितला जातो.
कृषी खात्याच्या माहितीनुसार राज्यात एकूण १.७१ कोटी शेतकरी आहेत. त्यापैकी १.४४ कोटींची नोंदणी पूर्ण झाली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या २४ व्या हप्त्याच्या आकडेवारीनुसार ८५.८५ लाख लाभार्थ्यांपैकी ८४.६० लाख शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक आयडी उपलब्ध आहे. सामायिक सातबारा असलेल्या शेतकऱ्यांचीही आता नोंदणी केली जात असून, त्यांच्या नोंदीत मालकीबाबत संयुक्त असा उल्लेख केला जाणार आहे.
नोंदणी कुठे आणि कशी करावी?
ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी अद्याप तयार झालेला नाही, त्यांनी जवळच्या शासकीय सेवा केंद्रात, म्हणजेच सीएससी केंद्रात जाऊन नोंदणी करावी. तसेच अॅग्रीस्टॅकच्या अधिकृत पोर्टलवर mhfr.agristack.gov.in/farmer-registry या पत्त्यावर ऑनलाइन नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे.
नोंदणीसाठी आधार कार्ड, आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक, सातबारा उताऱ्यावरील जमिनीचा तपशील, आधार ई-केवायसी आणि जमिनीच्या मालकीची पडताळणी आवश्यक आहे. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर फार्मर आयडी दिला जातो. नोंदणीत काही अडचण आल्यास अथवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास ती पडताळणीत समोर येते. त्रुटी दूर केल्यानंतर फार्मर आयडी मिळतो. यासंबंधी काही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
प्रतिक्रिया व्यक्त करा