देशाच्या कृषी क्षेत्रासाठी दिलासादायक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. हवामानातील चढउतार आणि अनेक अडचणींवर मात करत भारताच्या अन्नधान्य उत्पादनाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, तांदूळ उत्पादनाच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकत जगात अव्वल स्थान पटकावले आहे. सलग दुसऱ्या वर्षी भारताने ही कामगिरी करून दाखवली आहे.
गेल्या काही वर्षांपासून हवामानाशी संबंधित आव्हाने शेतकऱ्यांसमोर उभी राहत आहेत. काही भागांत अतिवृष्टी झाली, तर काही ठिकाणी कडक ऊन पडले. त्यामुळे शेतीचे गणित अनेकदा बिघडले. तरीही भारतीय शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीमुळे उत्पादनात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. देशातील एकूण अन्नधान्य उत्पादन ३,७८५.३८ लाख टनांवर पोहोचले आहे. मागील वर्षीच्या ३,५७७.३२ लाख टनांच्या तुलनेत यात २०८.०६ लाख टनांची वाढ झाली आहे.
तांदूळ आणि गहू उत्पादनात विक्रम
या वर्षी तांदळाचे उत्पादन १५५.१५४ दशलक्ष टन इतके झाले आहे. मागील आर्थिक वर्षात हे उत्पादन १५०.१८४ दशलक्ष टन होते. म्हणजेच तांदूळ उत्पादनात ४.९७ दशलक्ष टनांची वाढ झाली आहे. या कामगिरीमुळे भारताने तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकत जागतिक पातळीवर पहिले स्थान मिळवले आहे.
केवळ तांदूळच नव्हे, तर गहू उत्पादनातही भारताने विक्रम नोंदवला आहे. यंदा गव्हाचे उत्पादन १२२०.६४ लाख टनांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. मागील वर्षी गव्हाचे उत्पादन ११७९.४५ लाख टन होते, त्यामुळे यात ४१.१९ लाख टनांची वाढ झाली आहे. या आकडेवारीमुळे गहू उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
मका उत्पादनातही वाढ
तांदूळ आणि गव्हाबरोबरच मक्याच्या उत्पादनातही लक्षणीय वाढ दिसून आली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत बाहेरून येणाऱ्या स्वीट कॉर्नची चर्चा असताना भारतीय मक्यानेही चांगली कामगिरी केली आहे. एकूणच, अन्नधान्याच्या सर्व प्रमुख पिकांमध्ये झालेली ही वाढ भारतीय कृषी क्षेत्राची ताकद दाखवते. हवामानाच्या अडचणी असूनही उत्पादन वाढत राहणे, हे शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि कृषी व्यवस्थापनातील सुधारणांचे फलित मानले जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा