शरीरात रक्ताची कमतरता म्हणजेच अॅनिमिया दूर करण्यासाठी अनेकदा आयर्नची औषधं दिली जातात. मात्र केवळ आयर्न दिल्याने अॅनिमिया पूर्णपणे बरा होतोच असं नाही. दिल्लीतील एम्सच्या नव्या संशोधनातून अॅनिमियाच्या उपचारात व्हिटॅमिन-D चीही महत्त्वाची भूमिका असल्याचं समोर आलं आहे. ज्या रुग्णांमध्ये व्हिटॅमिन-D ची कमतरता असते, त्यांना आयर्नसोबत व्हिटॅमिन-D दिल्यास अधिक फायदा होतो.
संशोधनात काय आढळलं
या संशोधनात एकूण 400 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी 385 रुग्णांनी 90 दिवसांचा उपचार पूर्ण केला. सर्व रुग्णांना दररोज आयर्न असलेलं सप्लिमेंट देण्यात आलं. त्यात 300 मिलीग्रॅम फेरस फ्युमरेट, फोलेट, व्हिटॅमिन बी12 आणि इतर मिनरल्सचा समावेश होता.
डॉ. हरलोकश नारायण यादव यांनी सांगितलं की, रुग्णांचे तीन गट करण्यात आले होते. पहिल्या गटात व्हिटॅमिन-D ची पातळी योग्य असलेल्या रुग्णांना केवळ आयर्नचा उपचार देण्यात आला. दुसऱ्या गटात व्हिटॅमिन-D ची कमतरता असलेल्या रुग्णांना केवळ आयर्न देण्यात आलं. तिसऱ्या गटात व्हिटॅमिन-D ची कमतरता असलेल्या रुग्णांना आयर्नसोबत व्हिटॅमिन-D देण्यात आलं. तिसऱ्या गटातील रुग्णांना सुरुवातीच्या सहा आठवड्यांपर्यंत आठवड्यातून एकदा 60 हजार आययू कोलेकॅल्सीफेरॉल देण्यात आलं.
90 दिवसांनंतर तिन्ही गटांतील रुग्णांमध्ये सुधारणा दिसली. मात्र सर्वाधिक फायदा तिसऱ्या गटातील रुग्णांना झाला. त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन, लाल रक्तपेशींची संख्या आणि फेरिटिनच्या पातळीत सर्वाधिक वाढ झाली. व्हिटॅमिन-D ची कमतरता असूनही हे व्हिटॅमिन न दिलेल्या दुसऱ्या गटाला सर्वात कमी फायदा झाला. विशेषतः गंभीर अॅनिमिया असलेल्या रुग्णांना व्हिटॅमिन-D चा अधिक फायदा झाल्याचं दिसून आलं.
व्हिटॅमिन-D कसं मदत करतं
संशोधनानुसार, व्हिटॅमिन-D चं सक्रिय स्वरूप हेप्सिडिन नावाच्या हार्मोनची पातळी कमी करतं. त्यामुळे आतड्यांमधून आयर्नचं शोषण वाढतं आणि शरीरात साठवलेल्या आयर्नचा वापर चांगल्या प्रकारे होतो. तसंच सूज कमी होऊन रक्त तयार होण्याच्या प्रक्रियेला गती मिळते.
संपूर्ण संशोधनादरम्यान कोणतेही गंभीर दुष्परिणाम आढळले नाहीत. काही रुग्णांना अपचनाचा सौम्य त्रास झाला, जो कोणत्याही उपचाराशिवाय बरा झाला. कॅल्शियमची पातळी वाढणं किंवा व्हिटॅमिन-D विषारी ठरण्याची कोणतीही घटना आढळली नाही.
भारतात आयर्नच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया आणि व्हिटॅमिन-D ची कमतरता या दोन्ही समस्या सामान्य आहेत. देशात व्हिटॅमिन-D ची कमतरता 50 ते 90 टक्के लोकांमध्ये असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे केवळ आयर्न देऊन अनेक रुग्णांचा अॅनिमिया पूर्णपणे बरा होत नाही, असं या संशोधनातून स्पष्ट होतं.
प्रतिक्रिया व्यक्त करा