वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला जेवणात चक्क लोखंडी बोल्ट सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरू ते बेळगावी या मार्गावर प्रवास करताना प्रवाशाला जेवणात दिलेल्या वड्यात मोठा धातूचा बोल्ट आढळला. या प्रकारामुळे रेल्वेतल्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
प्रवाशाची तक्रार आणि IRCTC ची प्रतिक्रिया
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवासी बंगळुरूहून बेळगावीला वंदे भारत ट्रेनने प्रवास करत होता. प्रवासादरम्यान त्याला जेवणाचा भाग म्हणून दिलेल्या वड्यात मोठा धातूचा बोल्ट आढळल्याचा दावा त्याने केला. जेवणात अशी वस्तू आढळल्याने प्रवाशाला धक्का बसला. त्यानंतर त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकाराची माहिती शेअर केली आणि भारतीय रेल्वे तसंच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी केली.
प्रवाशाच्या तक्रारीची दखल घेत IRCTC ने प्रतिक्रिया दिली. या प्रकारामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल संस्थेने दिलगिरी व्यक्त केली. तसंच संबंधित सेवा पुरवठादाराविरोधात कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचं स्पष्ट केलं. IRCTC ने संबंधित किचन युनिटमधील कर्मचाऱ्यांना खाद्यपदार्थ तयार करताना निर्धारित मानक कार्यपद्धतीचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच संबंधित अधिकाऱ्यांना किचनची सखोल तपासणी करायला सांगितलं आहे. अन्न तयार करण्यापूर्वी वापरली जाणारी सर्व उपकरणं योग्य स्थितीत आहेत की नाहीत, याची खात्री करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
अन्न सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
वंदे भारतसारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये प्रवाशांना चांगल्या दर्जाचं जेवण मिळणं अपेक्षित असतं. पण जेवणात धातूची वस्तू आढळल्याच्या या घटनेमुळे रेल्वेच्या खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत आणि गुणवत्ता नियंत्रणाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी संबंधित अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी रेल्वे आणि IRCTC कडून अधिक कठोर देखरेख होणं गरजेचं आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा