कधी कधी नशिबाचे दार अगदी अनपेक्षितपणे उघडते. एखादी छोटीशी खरेदी आयुष्यातील सर्वात मोठा खजिना ठरू शकते. असाच काहीसा अनुभव ब्रिटनमधील एका महिलेला आला. एका स्थानिक चॅरिटी शॉपमधून तिने अवघ्या १ पाउंडला, म्हणजे सुमारे १०० रुपयांना, एक अंगठी खरेदी केली होती. दिसायला अगदी साधी असल्याने तिने ती सामान्य फॅशन ज्वेलरी समजली. मात्र, तिच्या या स्वस्त खरेदीमागे शेकडो वर्षांचा इतिहास आणि लाखोंची किंमत दडलेली होती, याची तिला कल्पनाही नव्हती.
या अंगठीचे खरे रहस्य उलगडले ते एका लोकप्रिय प्राचीन वस्तूंच्या कार्यक्रमात. महिला आपली अंगठी घेऊन या कार्यक्रमात पोहोचली होती. तिथे दागिन्यांचे तज्ज्ञ जॉन बेंजामिन यांनी अंगठीची तपासणी केली आणि तिचे ऐतिहासिक महत्त्व ओळखले. महिलेने सांगितले की, चॅरिटी शॉपमध्ये अनेक स्वस्त दागिन्यांमध्ये ही अंगठी तिला आवडली. डिझाइन छान वाटल्याने तिने फारसा विचार न करता ती विकत घेतली.
अंगठीच्या मागील बाजूने उलगडले रहस्य
सुरुवातीला या अंगठीत काही विशेष असल्याचे जाणवत नव्हते. मात्र, जॉन बेंजामिन यांनी अंगठी उलटी करून तिच्या मागील बाजूचे निरीक्षण केले आणि त्यांचे लक्ष एका खास नक्षीकामाकडे गेले. अंगठीच्या मागील बाजूस सूर्याच्या किरणांसारखी दिसणारी आकर्षक रचना होती. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे नक्षीकाम १७९० ते १८०० या काळातील जॉर्जियन युगातील दागिन्यांमध्ये आढळते. या एका खुणेमुळे अंगठीबाबतची उत्सुकता आणखी वाढली आणि तिची सविस्तर तपासणी करण्यात आली.
२२ कॅरेट सोने, हिरा आणि माणिक
तपासणीत समोर आलेल्या गोष्टींनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ही अंगठी तब्बल २२ कॅरेट सोन्यापासून बनवण्यात आली होती. तिच्या मध्यभागी असलेला राखाडी रंगाचा, किंचित धूसर दिसणारा खडाही साधासुधा नव्हता. तपासणीनंतर तो अस्सल हिरा असल्याचे स्पष्ट झाले. तर हिऱ्याभोवती जडवलेले लाल रंगाचे छोटे खडे हे मौल्यवान माणिक, म्हणजेच रुबी असल्याचे समोर आले.
अंगठीच्या उत्कृष्ट कारागिरीचा आणि ऐतिहासिक वैशिष्ट्यांचा अभ्यास केल्यानंतर जॉन बेंजामिन यांनी ती भारतात तयार करण्यात आलेली ऐतिहासिक मुगलकालीन अंगठी असल्याचे सांगितले. या दागिन्याचा संबंध मुगल साम्राज्याच्या समृद्ध कलाकुसरीशी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या अंगठीची अंदाजित किंमत तब्बल २,००० पाउंड, म्हणजे दोन लाख रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, ज्या अंगठीसाठी महिलेने केवळ १ पाउंड खर्च केला होता, तिची किंमत त्यापेक्षा जवळपास २,००० पट अधिक निघाली. एका सामान्य खरेदीचे असे अनपेक्षित रूपांतर झाल्याने ही घटना चर्चेचा विषय ठरली. जुन्या वस्तूंच्या दुकानांमध्ये किंवा सेकंडहँड बाजारात अनेकदा इतिहासाचा एखादा अनमोल ठेवा अगदी सामान्य वस्तूच्या रूपात पडलेला असू शकतो. त्याची खरी किंमत ओळखणारी नजर मात्र असावी लागते.
प्रतिक्रिया व्यक्त करा