लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस २०’मध्ये दिवसेंदिवस नवनवीन वाद पाहायला मिळत आहेत. घरातील स्पर्धकांमधील भांडणे आता विकोपाला जात असून, त्याचा परिणाम ‘वीकेंड का वार’ भागातही पाहायला मिळत आहे. या वेळी सलमान खानने स्काउट ओपी, गुल्लू आणि कनिका मान यांची चांगलीच शाळा घेतली. विशेष म्हणजे, लव्ह गिल आणि स्काउट यांच्यातील वादावरून सलमानने स्काउटला जाब विचारला. त्यामुळे आगामी भागाची चर्चा रंगली आहे.
लव्ह गिलबद्दलच्या चर्चेवरून वाद
काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात स्काउट आणि गुल्लू यांच्यात लव्ह गिलबद्दल चर्चा झाली होती. यावेळी दोघांनी तिच्याबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. याच मुद्द्यावरून घरात वाद निर्माण झाला. या भागात सलमान खान हा संपूर्ण विषय घरातील सदस्यांसमोर मांडताना दिसत आहे. सलमानने स्काउट आणि गुल्लू यांनी केलेल्या वक्तव्यांचा उल्लेख करताच लव्ह गिल भावूक झाली. तिच्या डोळ्यांत अश्रू आले आणि तिने सलमानकडे घरातून बाहेर जाण्याची परवानगी मागितली. मात्र, स्काउटने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असता सलमानने त्याला थांबवले. या विषयावर चर्चा करायची असेल तर ती लव्हच्या उपस्थितीतच होईल, असे सलमानने स्पष्ट केले.
सलमान खान स्काउटला थेट प्रश्न विचारताना दिसतो. स्काउट वारंवार स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो, मात्र सलमान त्याला मध्येच थांबवतो. लव्हला चुकीचे ठरवून स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेस का, असा सवालही सलमान करतो. इतकेच नाही, तर लव्हची इमेज खराब करण्यासाठी असे वक्तव्य केल्याबद्दल सलमान स्काउटला खडेबोल सुनावतो. स्काउटने आरोप नाकारल्यानंतर सलमान आणखी संतापतो. ‘हे तू आणि गुल्लू बोलला नाहीस तर मग, मी बोललो आहे का?’ अशा शब्दांत तो स्काउटला सुनावतो.
कनिका मानलाही सलमानचा दम
दुसरीकडे, कनिका मानही सलमानच्या निशाण्यावर आली. काझीसोबत सतत वाद घालणे आणि गुल्लूसोबत बसून इतर सदस्यांबद्दल चर्चा करणे, याशिवाय तुला दुसरे काही काम नाही का, असा सवाल सलमानने केला. गुल्लू आणि लव्हसोबत आक्षेपार्ह गप्पा मारताना तुला काही चुकीचे वाटत नाही, मात्र काझीने एखादी छोटी गोष्ट केली तरी तू त्यावर आक्षेप घेतेस, असे म्हणत सलमानने तिची कानउघाडणी केली.
दरम्यान, शनिवारच्या शेवटी स्काउट, लव्ह आणि कनिका यांच्या वागण्यावर सलमानने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे घरातील वातावरण तापले आहे. आता या फटकारल्यानंतर तिघेही आपल्या वागण्यात बदल करणार का आणि लव्ह-स्काउटमधील वाद आणखी कोणते वळण घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा