महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत. आमदार रोहित पवार हे पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रोहित पवार यांनी अलीकडेच महाराष्ट्राचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध भागांतील कार्यकर्ते आणि नेत्यांशी संवाद साधत मोठी चाचपणी केल्याचे समजते. त्यांच्या या हालचालींमुळे पक्षात नवी चर्चा सुरू झाली आहे.
आज मुंबईत महत्त्वाची बैठक
आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात मुंबईतील वाय. बी. चव्हाण सभागृहात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. या बैठकीपूर्वीच रोहित पवार यांच्या भूमिकेबाबतच्या चर्चांनी वेग घेतला आहे.
यापूर्वी नागपूरमध्ये रोहित पवार यांनी एक गोपनीय बैठक घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे पक्षातील बंड थोपवणे हे राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान ठरणार असल्याचे मानले जात आहे.
पुढे काय होणार?
रोहित पवार नेमकी कोणती भूमिका घेतात आणि पक्ष त्यावर कशी प्रतिक्रिया देतो, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आजच्या बैठकीनंतर चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा