उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२७ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील युती तसेच जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच समाजवादी पक्षाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने आपला जाहीरनामा तयार केला असल्याची माहिती समोर आली आहे. २६ नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्ताने अखिलेश यादव पक्षाचा जाहीरनामा जाहीर करणार आहेत. जाहीरनाम्याला जन-मन घोषणापत्र असे नाव देण्यात आले आहे. सत्ताईस का संकल्प, पीडीए का प्रण पत्र अशी घोषणा देण्यात आली आहे.
## जागांपेक्षा विजय महत्त्वाचा — अखिलेश यांची भूमिका
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावरील एक्स या मंचावर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. उत्तर प्रदेशात भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने एकत्रित रणनीती आखावी, अशी त्यांची भूमिका आहे. बात सीट की नहीं, जीत की है, असे म्हणत जागांपेक्षा विजयाचे गणित महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जिंकण्याची अधिक शक्यता असलेल्या उमेदवारालाच संधी देण्याची भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. कठीण मतदारसंघांत किमान दोन उमेदवारांवर चर्चा करून सहमतीने उमेदवार निश्चित करण्याचा प्रस्ताव त्यांनी समोर ठेवला आहे. आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवारांना पीडीए उमेदवार म्हणून मैदानात उतरवण्याची सूचना त्यांनी या पोस्टद्वारे केली आहे. पीडीए ही एनडीएला हरवेल, असा विश्वास व्यक्त करत उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करून केंद्रातही भाजपला पराभूत करण्याचे अखिलेश यादव यांचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अखिलेश यादव यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, तुमच्या टीमकडून प्राधान्याच्या आधारावर दिलेल्या जागांपैकी ज्या २६ जागांवर चर्चा झाली आहे, त्याव्यतिरिक्त इतर सर्व संभाव्य जागा निश्चित करून पाठवून द्याव्यात. त्यानंतर एकत्र बसून कोणती जागा आणि त्यावर कोणता उमेदवार जिंकण्याच्या स्थितीत आहे, हे पाहिले जाईल. दोन्ही पक्ष एकत्र आल्याने त्यांची तयारी ८०६ जागांच्या बरोबरीची असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. देशातील शेतकरी, मजूर, तरुण, मध्यमवर्ग, महिला, छोटे-मोठे व्यापारी, प्रामाणिक अधिकारी, कर्मचारी आणि संपूर्ण पीडीए समाज दोन्ही पक्षांकडे मोठ्या आशेने पाहत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
## काँग्रेस हायकमांड नाराज; नेत्यांना संयमाचा सल्ला
दरम्यान, समाजवादी पक्षासोबतच्या तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने आपल्या नेत्यांना सल्ला दिला आहे. सहारनपूरमधील जागांबाबत समाजवादी पक्षाची घोषणा आणि अखिलेश यादव यांनी २६ जागांचा उल्लेख करणारी सोशल मीडियावरील पोस्ट यामुळे काँग्रेस हायकमांड नाराज झाल्याचे सांगितले जात आहे. समाजवादी पक्षाच्या भूमिकेवर आपल्या नेत्यांना कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे निर्देश हायकमांडने दिले आहेत.
जर समाजवादी पक्षाचे असेच वर्तन सुरू राहिले आणि आपणही त्याला त्याच भाषेत उत्तर दिले तर आघाडीत अडचणी येतील, असे काँग्रेसचे मत आहे. काँग्रेसला गमावण्यासारखे काहीही नाही, मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा अखिलेश यांची आहे आणि ते सलग दोन टर्मपासून सत्तेबाहेर आहेत. त्यांचे सर्व काही उत्तर प्रदेशशी जोडलेले आहे, असेही पक्षाचे मत आहे. इंडिया आघाडीचे नेतृत्व करणारा पक्ष म्हणून आघाडी टिकवून ठेवण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे, मात्र हे वास्तव समाजवादी पक्षानेही समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे संयम राखला पाहिजे, अशा सूचना हायकमांडने दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा