दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे बुधवारी झालेल्या संविधान सन्मान महासभेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. पवार हे दाऊद इब्राहिम यांचे मित्र असल्याचा आरोप त्यांनी केला. कम्युनिस्ट पक्ष किंवा महाविकास आघाडीतील कोणीही हा मुद्दा उचलणार नाही, कारण राजकीय पक्षांच्या नेत्यांना गुलाम बनवण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. अशा परिस्थितीत देशाचे संविधानच नव्हे, तर स्वातंत्र्यही धोक्यात आले असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
राफेल आणि शेजारी राष्ट्रांवरून भाजपवर टीका
सत्ताधारी भाजपवरही आंबेडकर यांनी टीकेची झोड उठवली. देशात नेमकी किती राफेल विमाने आहेत, याबाबत सरकारला कोणी विचारणार आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खरेदी केलेली ३६ विमाने आहेत की आंतरराष्ट्रीय हवाई दलाच्या नियतकालिकानुसार ३२ आहेत, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. या विषयावर माध्यमे बातमी देणार आहेत का, असा सवालही त्यांनी केला. राजकीय पक्ष विकले गेले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
१९७१ मध्ये बांगलादेशला मुक्त करण्यासाठी भारतीय जवानांनी रक्त सांडले आणि तेथील पन्नास लाख ते दोन कोटी लोकांना अन्नधान्य पुरवले, याची आठवण त्यांनी करून दिली. त्या राष्ट्राशीही आताचे संबंध चांगले नसल्याचे ते म्हणाले. शेजारी राष्ट्रांशी भांडणे करायची आणि जगभर स्वतःला विश्वगुरू म्हणून मिरवायचे, अशी टीका त्यांनी केली.
श्रीलंकेत राम माधव कोणाला भेटायला गेले होते, याचाही खुलासा करण्याची मागणी आंबेडकर यांनी केली. राम माधव यांची पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी भेट झाली की नाही, हे जाहीर करावे, असे ते म्हणाले. हा प्रश्न विचारण्याचे धाडस राहुल गांधी यांच्यात नाही आणि उद्धव ठाकरे यांच्यात तर नाहीच, असेही ते म्हणाले.
देशाला मिळालेले राजकीय स्थैर्य हे संविधानामुळेच लाभले आहे, असे आंबेडकर म्हणाले. स्वातंत्र्यानंतर भारतात रक्तरंजित क्रांती झाली नाही, हे संविधानामुळेच शक्य झाले, असे ते म्हणाले. ज्या देशांत स्वातंत्र्यानंतर रक्तरंजित क्रांती झाली, ते देश आजही अस्वस्थ आहेत, असेही त्यांनी नमूद केले. संविधान ही देशाची सर्वांत मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी सांगितले.
अंजली आंबेडकर यांचाही हल्लाबोल
वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनीही राष्ट्रवादीचे नाव न घेता टीका केली. आंबेडकरी चळवळीने मांडलेले मुद्दे दुर्लक्षित केले जातात, मात्र तेच मुद्दे राहुल गांधी यांनी मांडले की त्यांचे कौतुक केले जाते, असे त्या म्हणाल्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये विचारवंतांची बैठक होते. त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर हे भाजपची बी टीम असल्याचा ठराव मंजूर केला जातो आणि असा खोटा प्रचार केला जातो, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर एक गट सतत बी टीमचा प्रचार करत असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र आपण याकडे दुर्लक्ष करून संघटनेची बांधणी सुरू ठेवली आहे, असे त्यांनी सांगितले. २५ डिसेंबर १९२७ रोजी बाबासाहेबांच्या विचारांनी मनुस्मृतीचे जोखड नागरिकांच्या मनावरून फेकून दिले, असेही त्या म्हणाल्या.
प्रतिक्रिया व्यक्त करा