मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रात अभिनयाने आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर आता उद्योजिका म्हणूनही चर्चेत आली आहे. तिच्या ‘अमुल्य बाय अमृता’ या साडी ब्रँडची प्रतिष्ठित फोर्ब्स इंडियाने दखल घेतली आहे. भारतातील लक्झरी ब्रँड्सच्या संस्थापकांच्या यादीत अमृताचा समावेश करण्यात आला आहे.
बहिणीच्या लग्नातील प्रसंग ठरला प्रेरणा
अमृतासाठी हा ब्रँड केवळ व्यावसायिक उपक्रम नाही, तर तिच्या वैयक्तिक अनुभवातून जन्माला आलेली कल्पना आहे. सुमारे बारा वर्षांपूर्वी बहिणीच्या लग्नाच्या वेळी तिला जाणवले की तिच्या कुटुंबातील कोणत्याही महिलेकडे अस्सल हातमागावर विणलेली पैठणी नाही. त्यानंतर तिने अस्सल पैठण्यांचा शोध सुरू केला. या शोधात तिला विणकरांचे जग, पारंपरिक कारागिरी आणि प्रत्येक साडीमागे दडलेल्या कथा जवळून समजल्या. एका वैयक्तिक अनुभवातून सुरू झालेला हा प्रवास पुढे व्यवसायाच्या कल्पनेत बदलला.
महिलांना अस्सल आणि सुंदर साड्यांचा अनुभव देता यावा, या उद्देशाने तिने २०२६ मध्ये ‘अमुल्य बाय अमृता’ या ब्रँडची सुरुवात केली. पारंपरिक हातमाग आणि विणकरांची कला अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवणे, हे तिचे उद्दिष्ट आहे. यासाठी ती विणकरांसोबत जवळून काम करते. त्यांच्या कलेची वैशिष्ट्ये समजून घेत खास आणि तरीही परवडणाऱ्या कलेक्शनवर भर दिला जात आहे. प्रत्येक साडीमागची मेहनत, परंपरा आणि कलात्मकता ग्राहकांपर्यंत पोहोचावी, हा या ब्रँडमागचा मुख्य विचार आहे.
मनोरंजन क्षेत्रातही ब्रँडची चर्चा
या ब्रँडची चर्चा आता मनोरंजन क्षेत्रातही होऊ लागली आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी एका कार्यक्रमासाठी ‘अमुल्य बाय अमृता’चा मराठमोळा साज परिधान केला होता. त्यामुळे या ब्रँडकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. आगामी ‘ईठा’ या चित्रपटासाठीही ‘अमुल्य बाय अमृता’ हा अधिकृत साडी ब्रँड म्हणून जोडला गेला आहे. त्यामुळे अमृताच्या व्यवसायाला मनोरंजन क्षेत्रातूनही मोठे व्यासपीठ मिळाले आहे. अभिनय, नृत्य आणि आता उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत अमृता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. फोर्ब्स इंडियाकडून झालेली दखल तिच्या या व्यावसायिक प्रवासासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा