अपडेट: शाहरुख खानच्या कायदेशीर पथकाने २६ नोव्हेंबर रोजी स्पष्ट केले की २३ नोव्हेंबरची ही मानहानीची नोटीस शाहरुख खानने किंवा त्याच्या वतीने जारी केलेलीच नाही. त्याचे अधिकृत वकील हिरानी असोसिएट्स यांनी सांगितले की शाहरुखने कोणत्याही वकिलाला किंवा विधी संस्थेला अशी नोटीस जारी करण्याचे निर्देश दिलेले नाहीत.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. उद्योगपती अनंत अंबानी आणि आध्यात्मिक गुरू सदगुरू यांच्यासोबतच्या एका भेटीदरम्यान शाहरुखला गप्प बसण्यास सांगितल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. या प्रकरणी शाहरुख खानने आता कायदेशीर पाऊल उचलले असून त्याच्या कायदेशीर पथकाने कंटेंट क्रिएटर सुविज्ञ शर्माला मानहानीची नोटीस पाठवली आहे.
व्हायरल रीलमध्ये नेमके काय होते?
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरलेल्या या रीलमध्ये अनंत अंबानी आणि सदगुरू यांच्यातील संवादाची काही दृश्ये दाखवण्यात आली आहेत. त्यासोबतच शाहरुख खान आणि अनंत अंबानी यांच्या संभाषणाची एक वेगळी क्लिपही जोडण्यात आली होती. ही रील सुविज्ञ शर्मा याने त्याच्या सोशल मीडिया खात्यावर प्रसिद्ध केली होती.
या व्हिडीओसोबत दिलेल्या मजकुरात शाहरुख खानला संभाषणादरम्यान शांत राहण्यास सांगितल्याचा दावा करण्यात आला होता. व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्यावरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आणि या विषयावर मोठी चर्चा सुरू झाली.
नोटीसमध्ये काय म्हटले आहे?
या प्रकरणावर शाहरुख खानच्या कायदेशीर पथकाने आक्षेप घेतला आहे. २३ नोव्हेंबर रोजी पाठवण्यात आलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये संबंधित रीलमधील मजकूर खोडसाळ, दिशाभूल करणारा आणि मानहानीकारक असल्याचे म्हटले आहे. व्हिडीओसोबत दिलेल्या मजकुरामुळे संभाषणाचा मूळ संदर्भ बदलला जात असून त्यामुळे अभिनेत्याची प्रतिमा आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या नोटीसमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५६ चा उल्लेख करण्यात आला आहे. हे कलम मानहानीशी संबंधित आहे. शाहरुखच्या कायदेशीर पथकाने सुविज्ञ शर्माला ४८ तासांत पाच मागण्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. सोशल मीडियावरील एका छोट्या क्लिपवरून सुरू झालेला हा वाद आता कायदेशीर वळणावर पोहोचला असून यापुढे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा