इजिप्तची राजधानी कैरोमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. कैरो शहरातील रिंग रोडवर एका ऑइल टँकरला अचानक आग लागली. या आगीत तब्बल ३१ जणांचा मृत्यू झाला असून २१ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. टँकरचा स्फोट झाल्यानंतर आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. रस्त्यावरील आजूबाजूच्या गाड्याही आगीच्या विळख्यात सापडल्या. या दुर्घटनेत दोन डझनहून अधिक कार आणि दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.
टँकर उलटला आणि स्फोट झाला
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणारा ऑइल टँकर चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेला आणि महामार्गावर उलटला. त्यानंतर टँकरमध्ये मोठा स्फोट झाला आणि आग लागली. काही वेळातच आगीने आजूबाजूच्या वाहनांनाही आग लागली आणि परिसरात एकच मोठी खळबळ उडाली.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कैरो शहराला जोडणाऱ्या मुख्य रिंग रोडवर हा अपघात झाला. गिझा प्रांतातील वर्राक परिसरात महामार्गाचा हा भाग येतो. हा परिसर दाट लोकवस्तीचा असून ग्रेटर कैरो क्षेत्राचा भाग आहे. या आगीत २१ जण जखमी झाले असून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
या भीषण आगीच्या घटनेनंतर इजिप्तचे आरोग्यमंत्री डॉ. खालिद अब्देल गफ्फार यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती दुःख व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांनी केली.
आरोग्यमंत्र्यांनी गिझा प्रांतातील इम्बाबामधील वर्राक परिसरात अशारा बोगद्याच्या वर लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. त्यांनी रुग्णालयांमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. रुग्णालयांमधील उपचारांची तयारी आणि आवश्यक सोयी वाढवण्यात आल्या आहेत की नाही, याचीही त्यांनी खात्री केली.
इजिप्तमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण अधिक आहे. दरवर्षी हजारो लोकांना रस्ते अपघातांमध्ये आपला जीव गमवावा लागतो. देशातील वाहतूक सुरक्षेची परिस्थितीही चिंताजनक आहे. भरधाव वेगाने वाहन चालवणे, रस्त्यांची खराब अवस्था आणि वाहतुकीच्या नियमांचे योग्य पालन न करणे ही अपघातांची प्रमुख कारणे मानली जातात.
प्रतिक्रिया व्यक्त करा