मुंबई महानगरपालिकेला पुन्हा एकदा धमकीचा मेल आला आहे. या मेलमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच महालक्ष्मी मेट्रो स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे. सतत येत असलेल्या धमकीच्या मेलमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
सकाळी १०.१२ वाजता आला मेल
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या ई-मेल आयडीवर सकाळी १०.१२ वाजता हा मेल आला. महानगरपालिकेचे मुख्यालय आणि महापौर कार्यालय उडवून टाकण्याची धमकी या मेलमध्ये देण्यात आली आहे. एवढेच नाही तर अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला उडवण्याची धमकीही या ई-मेलमध्ये देण्यात आली आहे. मुंबईतील मेट्रो स्टेशन आणि महालक्ष्मी रेस कोर्स ही ठिकाणेही उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांत हा पाचव्यांदा धमकीचा मेल आला आहे. यावर मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस प्रशासन काय उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वीही धमक्या आल्या
यापूर्वीही अमिताभ बच्चन यांना ‘जलसा’ बंगला बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका ई-मेलद्वारे मिळाली होती. याशिवाय प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टलाही ग्रेनेडने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. अभिनेता सलमान खान, टायगर श्रॉफ आणि रोहित शेट्टी यांच्यावर थेट गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे बॉलिवूडमध्ये सध्या दहशतीचे वातावरण आहे. सातत्याने येणाऱ्या धमक्या आणि हल्ल्यांमुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. धमकीचा मेल आल्यानंतर बिग बी ‘जलसा’ बंगल्याबाहेर रविवारी चाहत्यांना भेटण्यासाठी आले होते, मात्र तेव्हा सुरक्षेची काळजी घेत ते बुलेटप्रुफ काचेमागून चाहत्यांना भेटले होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा