धाराशिव जिल्ह्यात दुष्काळामुळे रेशीम उद्योगाला मोठा फटका बसला आहे. पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे जिल्ह्यातील तब्बल ६०० एकर क्षेत्रावरील तुतीच्या बागा पूर्णपणे सुकल्या आहेत. तुतीचा पाला उपलब्ध नसल्याने रेशीम अळ्यांना खाद्य मिळत नाही. त्यामुळे कोष उत्पादनात लक्षणीय घट झाली असून रेशीम उत्पादकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
दहा वर्षांपासून सुरू असलेला उद्योग संकटात
या भागात जवळपास दहा वर्षांपासून रेशीम उद्योग सातत्याने सुरू आहे. थंडी असो वा पाऊस, कोणताही हंगाम असो, शेतकरी हा उद्योग नेटाने करत आले आहेत. मात्र यंदाच्या भीषण दुष्काळामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अचानक आलेल्या गारव्यामुळेही रेशीम अळ्यांवर विपरीत परिणाम झाला आहे. अळ्यांनी पाला खाऊनही अपेक्षेप्रमाणे कोष तयार झाले नाहीत, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
लाखोंचे नुकसान; मदतीची अपेक्षा
एका रेशीम उत्पादकाचे अंदाजे दीड ते पावणे दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या बाजारात कोषाचा भाव ८५० ते ९०० रुपये प्रति किलो आहे. बागा सुकल्याने आणि उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे धाराशिवमधील रेशीम उद्योग पूर्णपणे संकटात सापडला असून शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply