मालेगाव कॅम्पजवळील टेहरे येथील महामार्गावर सणासुदीच्या काळात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या ठिकाणी उड्डाणपुलाचे आणि रस्ते विकासाचे काम सुरू असून दिवाळीचा सण संपल्यावर परतीचा प्रवास करणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.
रविवारी (ता. १५) दुपारी चारच्या सुमारास राजधानी हॉटेल ते थेट मनमाड चौफुलीपर्यंत महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिवाळीच्या सुट्ट्या आणि रविवार असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली होती. पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचा प्रतिसाद वाढत असून सुट्टी संपल्यावर परतीचा प्रवास करणाऱ्या चारचाकी वाहनांची गर्दीही वाढली आहे.
कोंडी सुटण्यासाठी नियोजनाची मागणी
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी आणि महामार्ग पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे बनले आहे. या ठिकाणी सुरक्षा प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी तिढा सोडवण्यासाठी सुरक्षा रक्षक पुढे येताना दिसत नसल्याची तक्रार आहे.
उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी टेहरे बोगद्याजवळील रस्ता अरुंद असल्यामुळे त्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते. वाहनचालकांना अडथळ्यामुळे बराच वेळ खर्ची पडत आहे. सणासुदीच्या काळात आठ ते दहा दिवसांपासून वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस प्रशासन आणि महामार्गावरील कर्मचाऱ्यांनी वाहतुकीचे योग्य नियोजन करून वाहनांची कोंडीतून सुटका करावी, अशी मागणी टेहरे ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी केली आहे.
Leave a Reply