सणासुदीच्या सुट्ट्या संपवून आपल्या गावी व माहेरी आलेले चाकरमाने आणि माहेरवाशिणी पुन्हा आपल्या कामाच्या व सासरच्या गावी परतण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील प्रमुख बसस्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली आहे. एसटी बसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे.
वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीसाठी नाशिकहून अनेक प्रवासी आपल्या मूळगावी परतले होते. तर इतर शहरांमध्ये वसलेल्या नाशिककरांनीही आपली पावले नाशिककडे वळविली होती. त्यामुळे बसस्थानकांवर काही दिवसांपासून नियमित गर्दी बघायला मिळत होती. काही शाळा आणि महाविद्यालयांना सोमवार, १६ नोव्हेंबरपासून सुरुवात होत असल्याने, तसेच शासकीय व खासगी कार्यालयांत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या संपत असल्याने परतीच्या प्रवासाचे वेध लागले होते.
रविवारी सकाळपासूनच शहरातील नवीन सीबीएस, मेळा बसस्थानक आणि महामार्ग बसस्थानक येथे प्रवाशांनी तुडुंब गर्दी केली होती. बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेषतः मुंबई, पुणे, धुळे, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर मार्गावर जाणाऱ्या बसना प्रवाशांची सर्वाधिक पसंती आहे. बस फलाटावर लागताच आत शिरण्यासाठी आणि आसन मिळवण्यासाठी प्रवाशांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळाली. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या गर्दीचा सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागला. बॅगांचे ओझे सांभाळत बस पकडताना प्रवाशांची चांगलीच दमछाक झाली.
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने जादा बसेसचे नियोजन केले होते. मात्र, प्रवाशांची संख्या प्रचंड असल्याने या जादा फेऱ्याही अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे.
खासगी ट्रॅव्हल्सची चांदी
या हंगामी काळात खासगी ट्रॅव्हल्सच्या बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक प्रवासी जादाचे पैसे अदा करून तिकीट निश्चित करत आहेत. त्यामुळे ट्रॅव्हल्स व्यवसायाची चांदी झाली आहे. काही ट्रॅव्हल्स व्यवस्थापनाकडून थेट बसस्थानकाच्या आवारातून प्रवाशांना गळ घातली जात असल्याचेही दृश्य बघायला मिळाले.
सिडकोतील बाजारपेठा गजबजल्या
भाऊबीज म्हटले की बहिणींचे लाड आणि भाच्यांचे हट्ट पुरवण्याची लगबग सुरू होते. दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या बहिणींना आवडीच्या वस्तू घेऊन देण्यासाठी भाऊ सिडकोतील बाजारपेठेत गर्दी करत आहेत. त्याचबरोबर भाच्यांसाठी खेळणी, कपडे आणि विविध भेटवस्तूंची खरेदीही केली जात आहे. उत्तमनगर, पवननगर, सावतानगर, त्रिमूर्ती चौक आणि अंबड एमआयडीसी परिसरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिला व लहान मुलांची गर्दी वाढली आहे. मामाच्या गावाला आलेल्या भाच्यांना आवडीच्या वस्तू मिळत असल्याने त्यांचाही आनंद द्विगुणित होत आहे.
Leave a Reply