सातपूरच्या स्वारबाबानगर परिसरातील महापालिका शाळा क्रमांक २६ मध्ये फटाक्यांच्या ठिणगीमुळे वर्गखोलीजवळ विद्यार्थ्यांच्या बसण्यासाठी ठेवलेल्या बेंचला आग लागल्याची घटना शनिवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास घडली. सुदैवाने दिवाळीची सुट्टी सुरू असल्याने शाळेत विद्यार्थी व शिक्षक उपस्थित नव्हते. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
फटाक्याची ठिणगी बेंचवर पडल्याची प्राथमिक शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या वर्गखोलीजवळ विद्यार्थ्यांच्या बसण्यासाठी बेंच व शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आले होते. शनिवारी रात्री परिसरात फटाके फोडले जात असताना त्यातील एखाद्या फटाक्याची ठिणगी बेंचवर पडल्याने आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही वेळातच बेंचने पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली.
शाळा परिसरात फटाके फोडताना खबरदारी गरजेची
शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचे ज्ञानमंदिर. या ठिकाणी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य, पुस्तके, फर्निचर तसेच विविध महत्त्वाच्या वस्तू असतात. अशा ठिकाणी फटाक्यांच्या ठिणगीमुळे आग लागण्याची घटना घडणे ही गंभीर बाब आहे. शाळेच्या परिसरात फटाके फोडताना संबंधितांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. काही क्षणांच्या आतषबाजीच्या उत्साहामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याबरोबरच मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.
Leave a Reply