दुपारी उन्हाचा कडाका आणि पहाटे व रात्री जाणवणारा गारवा, अशा बदलत्या हवामानाचा नवी मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शहरातील विविध रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील तीन-चार दिवसांपासून शहरातील वातावरणात गारवा वाढला आहे. पहाटे आणि सकाळी थंडी जाणवत असली, तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका बसत आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानातील तफावतीमुळे नागरिकांना ताप, अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी तसेच घसा खवखवण्यासारख्या तक्रारी जाणवत आहेत. त्यामुळे उपचारासाठी दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
आहारातील बदलही कारणीभूत
दिवाळीच्या काळात फराळातील तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन वाढते. बदलते हवामान आणि आहारातील बदल यामुळे आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्याबरोबरच आहाराकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
तपासणी मोहिमेची मागणी
दरम्यान, रुग्णसंख्येतील वाढ लक्षात घेता नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरी आरोग्य केंद्रांमार्फत विशेष तपासणी आणि जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे, स्वच्छता राखावी, ताजे व सकस अन्न घ्यावे आणि थंडीपासून बचाव करावा. ताप किंवा अन्य लक्षणे जाणवल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
Leave a Reply