दिवाळीच्या दिवसांत घराघरांत पणत्या उजळतात, आकाशकंदील चमकतात आणि कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो. मात्र याच वेळी शहरातील चौकाचौकांत, रस्त्यांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणी काहीजण आपल्या आनंदाचा विचार न करता दुसऱ्यांची दिवाळी सुरक्षित ठेवण्यासाठी कर्तव्य बजावत असतात. हे असतात आपले पोलिस बांधव. त्यांच्या निःस्वार्थ सेवेची जाणीव ठेवून लातूरच्या वसुंधरा वृक्षरूपी गणेश मंडळाने दिवाळीतील आनंदाचे क्षण त्यांच्यासोबत साजरे केले.
पोलिस ठाण्यांना भेट देऊन मिठाईचे वाटप
वसुंधरा प्रतिष्ठानच्या वसुंधरा वृक्षरूपी गणेश मंडळातर्फे थँक्यू पोलिस हा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून दिवाळीनंतर पोलिस ठाण्यांना भेट देऊन मिठाईचे वाटप केले जाते. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत काही क्षण आनंदाने घालवून त्यांनाही दिवाळीच्या उत्सवात सहभागी करून घेतले जाते. यंदाही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा
पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्यासह ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप करून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा, कार्याध्यक्ष अमोल स्वामी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मिठाईच्या गोडव्यातून कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम पोलिस आणि नागरिकांमधील नाते अधिक घट्ट करणारा ठरला.
Leave a Reply