दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्यापासून वणी येथील सप्तशृंगगडावर भाविकांची मोठी गर्दी होत आहे. राज्याबरोबरच परराज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने कुटुंबासह देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. अशा वेळी मंदिराच्या दर्शनवेळेत वाढ होईल, अशी अपेक्षा भाविकांना होती. मात्र सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट प्रशासनाने यंदा वेळापत्रकात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे भाविकांना नेहमीच्या वेळेतच दर्शन घ्यावे लागणार आहे.
दरवर्षीची वाढ यंदा नाही
दरवर्षी भाऊबीज ते त्रिपुरारी पौर्णिमा या काळात भाविकांची संख्या लक्षात घेऊन मंदिराची दर्शनवेळ तीन तासांनी वाढवली जाते. नेहमी पहाटे पाच ते रात्री नऊ या वेळेऐवजी मंदिर पहाटे पाच ते मध्यरात्री बारापर्यंत खुले ठेवले जाते. त्यामुळे गुजरातमधून पायी पालख्यांनी येणाऱ्या पदयात्रेकरूंसह सायंकाळी उशिरा गडावर पोहोचणाऱ्या भाविकांना दर्शन घेता येते. गर्दीचे विभाजन होऊन दर्शन सुलभ होते. यंदा मात्र असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, त्यामुळे अनेक भाविकांना पहिल्या पायरीपासूनच परतावे लागत आहे.
सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्णय
सप्तशृंगगडासह त्र्यंबकेश्वर आणि काळाराम मंदिराला धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस दल सतर्क झाले आहे. गडावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सुरक्षेच्या विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रस्ट आणि प्रशासनाने दर्शनवेळ वाढवू नये, असा निर्णय घेतल्याचे समजते. धमकीच्या ई-मेलला न जुमानता भाविकांचा ओघ सुरूच आहे. मर्यादित वेळेमुळे रांगा वाढत असून अनेकांना कळसाचे आणि पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन माघारी परतावे लागत आहे. सुरक्षेच्या उपाययोजना कायम ठेवून किमान मध्यरात्री बारापर्यंत तरी मंदिर खुले ठेवावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. गर्दीचे नियोजन आणि भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रस्ट प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Leave a Reply