सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

वाहनाचं सरप्राईज गिफ्ट आणि ‘रिल’चा नवा ट्रेंड

दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसोबतच प्रियजनांना वाहन सरप्राईज भेट देण्याचा ट्रेंड वाढला असून, या क्षणांचे रिल बनवण्यातून तरुणांना रोजगाराची संधी मिळाली.

वाहनाचं सरप्राईज गिफ्ट आणि ‘रिल’चा नवा ट्रेंड

गणपती, नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी या वर्षभरातील सर्वांत मोठ्या सण-उत्सवांचा काळ नुकताच पार पडला. या काळात मुहूर्तावर नवीन वाहने खरेदी करण्याकडे नागरिकांचा मोठा कल दिसून आला. मात्र यंदा पारंपरिक वाहन खरेदीसोबतच आपल्या प्रियजनांना वाहने सरप्राईज भेट देण्यावर आणि या आनंदाच्या क्षणांचे आकर्षक ‘रिल’ बनवून सोशल मीडियावर शेअर करण्याच्या नव्या ट्रेंडची चर्चा अधिक झाल्याचे दिसून आले.

वाढदिवसाला वाहनाचं सरप्राईज

दसरा आणि दिवाळीच्या मोठ्या मुहूर्तावर वाहनांची हमखास खरेदी होत असल्याने शोरूममध्ये आधीच गाड्यांचे बुकिंग पूर्ण झालेले असते. या पारंपरिक खरेदीसोबतच आता आपल्या प्रियजनांना वाढदिवस आणि विशेषप्रसंगी हक्काचे वाहन सरप्राईज भेट म्हणून देण्याची क्रेझ वाढली आहे. हा सुखद धक्का देण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. त्यासाठी वाढदिवसाच्या तारखेपूर्वीच शोरूममध्ये जाऊन गाडीचे बुकिंग आणि सर्व कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केली जाते. नंतर प्रत्यक्ष वाढदिवसाला शोरूममध्ये आणून किंवा थेट घरी वाहन पोहोचवून कुटुंबीयांना सुखद धक्का दिला जातो. वाहन ताब्यात देताना शोरूमतर्फेही खास तयारी केली जाते. वाहनासोबत फोटोसेशन, चावी सुपूर्द करताना वाजणारे म्युझिक, रंगीबेरंगी पताकांची उधळण आणि केक कापून हा क्षण अविस्मरणीय केला जातो. अचानक मिळालेल्या या अनोख्या भेटवस्तूमुळे घरातील वातावरणात आनंद आणि आश्चर्य निर्माण होते. सोशल मीडियाच्या या जमान्यात एआय तंत्रज्ञानाची भर पडल्याने या ट्रेंडला अधिकच चालना मिळाली असून, प्रत्येकजण आपला आनंद जगासमोर अनोख्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

‘रिल मेकिंग’मधून रोजगाराची संधी

पूर्वी शोरूममध्ये वाहन घेताना केवळ साधे फोटो काढले जात असत. परंतु आता या संपूर्ण प्रसंगाचे सिनेमॅटिक रिल बनवण्याला मोठी पसंती मिळत आहे. यासाठी स्वतंत्रपणे शुल्क देऊन व्यावसायिक ‘रिल स्टार’ किंवा व्हिडिओग्राफर्सना पाचारण केले जात आहे. ग्राहक शोरूममध्ये एन्ट्री करण्यापासून ते वाहनाची पूजा, चावी स्वीकारणे आणि नवीन वाहन चालवत शोरूममधून बाहेर पडेपर्यंतच्या प्रत्येक क्षणाचे आकर्षक चित्रण करून त्याचे रिल तयार केले जाते. सोशल मीडियावर या रिल्सला मिळणारी पसंती पाहता याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. या वाढत्या मागणीमुळे डिजिटल क्षेत्रात तरुणांसाठी ‘रिल मेकिंग’च्या माध्यमातून एक नवा व्यवसाय आणि रोजगाराचे साधन उदयास आले आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance