सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

मालेगावात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ; मोबाईल चोरीत वाढ

मालेगावात दुचाकीस्वार चोरट्यांकडून मोबाईल चोरीचे प्रकार वाढले आहेत. कोणत्या भागांत धोका जास्त आहे आणि मोबाईल ठेवण्यासाठी पोलिसांनी काय सांगितले, वाचा सविस्तर.

मालेगावात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ; मोबाईल चोरीत वाढ

मालेगाव शहरात दुचाकीवरून येणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. दुचाकीवर दोघे येऊन रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांच्या शर्टाच्या खिशातील किंवा हातातील मोबाईल हिसकावून भरधाव वेगाने पळून जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शहराबाहेर जाणारे मुख्य रस्ते आणि निर्मनुष्य भाग या चोरट्यांचे मुख्य लक्ष्य बनले आहेत.

दिवाळीच्या सणानिमित्त परतीच्या प्रवासात असलेले नागरिक तसेच सकाळी आणि सायंकाळी फिरायला जाणारे लोक या चोरट्यांच्या निशाण्यावर आहेत. आता तर हातातील मोबाईल थेट हिसकावून बाईकवर फरार होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे आरोग्यासाठी फिरायला बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्या भागांत धोका जास्त

चाळीसगाव फाटा परिसर, मनमाड चौफुली, महामार्ग, सटाणा-दाभाडी रस्ता, कॅम्प-दाभाडी रस्ता, सोमवार बाजार परिसर, दौलती इंग्लिश स्कूल परिसर, नामपूर रस्ता आणि मन्सुरा ते शालीमार चंदनपुरी रस्ता या भागांत मोबाईल चोरून नेण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांचे आवाहन आणि नागरिकांची मागणी

मोबाईल ही आज सर्वसामान्य नागरिकांची दैनंदिन गरज बनली आहे. त्यामुळे चोरीला गेलेला मोबाईल शोधण्यासाठी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याऐवजी अनेक नागरिक नवीन मोबाईल खरेदी करणे पसंत करतात. याचाच गैरफायदा चोरटे घेत आहेत. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाला वेग यावा यासाठी शहरातील मुख्य चौकांमध्ये आणि रस्त्यांवर सीसीटीव्ही बसवावेत, अशी आग्रही मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता आपला मोबाईल सुरक्षित ठेवावा. शर्टाच्या वरच्या खिशात मोबाईल ठेवणे किंवा रस्त्याने चालताना फोनवर बोलणे टाळावे. आसपासच्या परिसरात तोंडावर रुमाल बांधलेल्या संशयास्पद व्यक्तींपासून सावध राहावे आणि कोणावर संशय असल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी केले आहे. सामाजिक कार्यकर्ते अमोल महाडीक यांनी मोबाईल नेहमी पँटच्या किंवा जॅकेटच्या खालच्या खिशात ठेवावा, इतरांनाही जागरूक करावे, पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास मोबाईलमधील डेटाचा गैरवापर टाळता येतो आणि स्वस्त मिळतो म्हणून जुने किंवा चोरीचे मोबाईल खरेदी करणे तातडीने बंद करावे, असे सांगितले आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance