खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकाची वेचणी नवरात्रोत्सवात गतीने सुरू झाली होती. मात्र सध्या सणासुदीच्या काळात कापसाची आवक कमी असल्याने जिनिंग-प्रेसिंग कारखान्यांतील प्रक्रिया रखडत सुरू आहे. खानदेशात अद्याप ८० टक्के जिनिंग-प्रेसिंग कारखाने बंद आहेत. जळगाव जिल्ह्यात धरणगाव आणि पारोळा भागातील आघाडीचे कारखाने सुरू असले, तरी तेथेही प्रक्रिया पूर्ण क्षमतेने सुरू नाही.
पाऊसमान कमी राहिल्याने कोरडवाहू कापूस पिकाची स्थिती बिकट आहे. कापूस उत्पादन कमी झाल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. कापसाचा बाजार मागील काही दिवसांत अस्थिर झाल्यानेही काही कारखानदारांनी सावध पवित्रा घेतला आहे.
खेडा खरेदीही मंदावली
खानदेशात कापूस खेडा पद्धतीने किंवा थेट खरेदी केला जातो. दिवाळी आणि कोजागिरी पौर्णिमेच्या काळात ही खेडा खरेदी जोर धरते. मात्र यंदा दसऱ्याच्या काळातही कापसाची आवक कमी राहिली. दिवाळीतही आवक कमीच राहील, अशी चिन्हे आहेत.
बागायती तसेच पूर्वहंगामी क्षेत्रातील कापसाची वेचणी सुरू होताना पाऊस नव्हता आणि सप्टेंबरपासून कोरडे वातावरण आहे. त्यामुळे वेचणी काहीशी लवकर सुरू झाली असून ती गतीने सुरू आहे. पण लागवड कमी असल्याने आवकही कमी आहे. खेडा खरेदीही अपेक्षेप्रमाणे सुरू झालेली नाही. दिलासादायक बाब म्हणजे यंदा कापसाचा दर्जा चांगला आहे, कारण परतीच्या पावसाचा पूर्वहंगामी पिकाला फारसा तडाखा बसला नाही.
खानदेशात दरवर्षी सुमारे १२० ते १३० कारखाने कापसावर प्रक्रिया करतात. एका कारखान्याला रोज किमान ८० ते ९० क्विंटल कापूस लागतो. मात्र आवक कमी असल्याने आणि सणासुदीचा काळ असल्याने प्रक्रिया मंदावली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply