मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात नाशिक जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर आता विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय निकालातही नाशिकने चौकार मारला आहे. ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या निकालात विभागस्तरावर दुगाव, तर जिल्हास्तरावर फुलेमाळवाडी, हनुमाननगर आणि दरी या ग्रामपंचायतींची निवड झाली आहे.
विभागस्तरीय निकाल
ग्रामविकास विभागाने शुक्रवारी, ६ नोव्हेंबर रोजी समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ या वर्षाचे विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय निकाल जाहीर केले. विभागस्तरावर दुगाव (ता. नाशिक) ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचे एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. त्यापाठोपाठ रेनवाडी (ता. पारनेर, अहिल्यानगर) ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाचे ८० लाख रुपये, तर लोणी बुद्रुक (ता. राहाता, अहिल्यानगर) ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचे ६० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय निकाल
जिल्हास्तरीय पुरस्कारांमध्ये फुलेमाळवाडी (ता. देवळा) ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचे ५० लाख रुपये, हनुमाननगर (ता. निफाड) ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाचे ३० लाख रुपये, तर दरी (ता. नाशिक) ग्रामपंचायतीला २० लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक मिळाले आहे. ग्रामविकासमंत्री, राज्यमंत्री, पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे लवकरच वितरण होणार असल्याचे ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रशांत पाटील यांनी शासन निर्णयात म्हटले आहे.
या अभियानासाठी ग्रामविकास विभागाने १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत उत्कृष्ट ग्रामपंचायतींची स्पर्धा घेतली होती. प्रत्येक तालुक्यातून दोन ग्रामपंचायतींची जिल्हास्तरावर, तर त्यातून दोन ग्रामपंचायतींची विभागस्तरावर निवड करण्यात आली. प्रत्येक विभागातून दोन ग्रामपंचायती राज्यस्तरावर निवडल्या गेल्या. सर्वाधिक ग्रामपंचायती नाशिक जिल्ह्यातून निवडल्या गेल्याने नाशिकने राज्यात प्रथम क्रमांकाचे पाच कोटी रुपयांचे पारितोषिक पटकावले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नाशिक जिल्हा परिषदेला सन्मानित करण्यात आले होते.
जिल्ह्यात १२ कोटींची समृद्धी
या अभियानाच्या माध्यमातून नाशिक जिल्हा परिषदेला तब्बल १२ कोटी रुपये बक्षीस रूपाने मिळाले आहेत. जिल्हा परिषदेला प्रथम क्रमांकाबद्दल पाच कोटी रुपये, नाशिक पंचायत समितीला दोन कोटी रुपये आणि लाडूद (ता. बागलाण) ग्रामपंचायतीला तीन कोटी रुपयांचे बक्षीस (विभागून) जाहीर झाले आहे. त्यापाठोपाठ आता विभागस्तरीय पुरस्कारांच्या माध्यमातून दोन कोटींचा निधी मिळणार असल्याने जिल्ह्यात ग्रामपंचायतींना विविध विकासकामांसाठी तब्बल १२ कोटींचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. पुढील वर्षीच्या पुरस्कारासाठी त्याचा फायदा होईल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी व्यक्त केला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply