अजित पवार यांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. कदम यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांचा तटकरे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून उर्वरित आरोपांबाबत कायदेशीर नोटीस देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अलीकडच्या काळात रामदास कदम यांची मानसिक स्थिती पाहता ठाण्यापेक्षा आग्र्याला मानसोपचारतज्ज्ञ चांगले आहेत, तिथे नेऊन त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार सुरू करावेत, असेही तटकरे म्हणाले.
तटकरे काय म्हणाले?
तटकरे म्हणाले, अंतुले साहेबांनी माझ्यावर प्रेम केले, कार्यकर्ता म्हणून त्यांनी मला संधी दिली. त्यांचा मी आदर करतो, मात्र मी त्यांचा पीए कधीही नव्हतो. याउलट धर्मांधांनी त्यांच्यावर किती गरळ ओकली, ते सर्वांना माहित आहे. त्यामुळे अंतुले साहेबांबाबत बोलण्याचा अधिकार रामदास कदम यांना नाही. माझ्यावर आरोप करण्यापेक्षा उबाठाचे नेते रामदास परब यांनी जे आरोप केले आहेत, त्याची आधी त्यांनी उत्तरे द्यावीत, असे आव्हान तटकरे यांनी दिले.
मी याआधी कधीही कैफियत मांडली नाही. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान या सर्वांना सुनील तटकरेची पार्श्वभूमी माहिती आहे, असेही तटकरे म्हणाले. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधी पक्षनेतेपदाचे पत्र आले होते, तेव्हा हेच रामदास कदम सुनील तटकरेकडे आले, माझ्या हातापाया पडले, माझ्यासोबत गाडीत आले आणि मी त्यांना अजित पवारांकडे घेऊन गेलो, तेव्हा ते विरोधी पक्षनेते झालेत, असा दावा तटकरे यांनी केला. रामदास कदम जागृत देवस्थानच्या परिसरात राहतात, तिथे येऊन त्यांनी सांगावे की मी खोटे बोलतोय, असेही तटकरे म्हणाले.
विलीनीकरणाचा विषय संपला
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपला, अशी स्पष्ट भूमिका तटकरे यांनी घेतली. दादा असते तर १२ फेब्रुवारीला विलीनीकरणाचा निर्णय झाला असता, असे ते म्हणाले. योग्य वेळी सर्वकाही सांगेन, मला केव्हा काय बोलायचे ते कळते, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply