दिवाळीनिमित्त घरोघरी विविध प्रकारचे गोडधोड पदार्थ बनवले जातात. याशिवाय बाजारातूनही वेगवेगळ्या प्रकारची मिठाई आणली जाते. अनेक जण नातेवाईक आणि मित्रमंडळींना मिठाई भेट म्हणून देतात. त्यामुळे दिवाळी संपल्यानंतरही घरात बरीच मिठाई शिल्लक राहते. फ्रिजमध्ये ठेवलेली ही मिठाई पुन्हा खाण्याचा कंटाळा येतो आणि ती संपवायची कशी, असा प्रश्न पडतो. मात्र उरलेल्या मिठाईचा वापर करून काही चविष्ट पदार्थ तयार करता येतात. जाणून घेऊया मिठाईचा नव्या पद्धतीने पुनर्वापर करण्याच्या काही सोप्या कल्पना.
सोनपापडीपासून पुरणपोळी
दिवाळीत अनेकांना सोनपापडी मिठाई भेट म्हणून मिळते. त्यामुळे अनेक घरांमध्ये सोनपापडीचे बॉक्स तसेच पडून राहतात. घरात सोनपापडी शिल्लक असेल तर तिचा वापर करून चविष्ट पुरणपोळी तयार करता येते. यासाठी सोनपापडीमध्ये थोडे दूध घालून त्याची मऊ पेस्ट तयार करावी. या मिश्रणाचा पुरणपोळीच्या सारणाप्रमाणे वापर करून पोळ्या बनवाव्यात. नेहमीच्या पुरणपोळीपेक्षा ही पोळी वेगळी आणि चवीला गोड लागेल.
खव्याच्या मिठाईपासून शेक
फ्रिजमध्ये खव्यापासून बनवलेली मिठाई शिल्लक असेल तर तिचा वापर करून स्वादिष्ट शेक तयार करता येतो. यासाठी थंड दुधात खव्याची मिठाई घालून मिक्सरमध्ये चांगले फिरवून घ्यावे. गरजेनुसार त्यात थोडे दूध वाढवावे. अशा प्रकारे तयार झालेला क्रीमी आणि गोड शेक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडू शकतो.
बुंदीच्या लाडवांपासून खीर
दिवाळीत बुंदीचे लाडू जास्त प्रमाणात आले असतील तर त्यांच्यापासून वेगळ्या चवीची खीर तयार करता येते. यासाठी एका भांड्यात दूध घेऊन ते थोडे घट्ट होईपर्यंत गरम करावे. त्यानंतर त्यात बुंदीचे लाडू कुस्करून घालावेत आणि मिश्रण चांगले शिजू द्यावे. लाडूंचा गोडवा दुधात उतरल्यामुळे चविष्ट बुंदीची खीर तयार होईल.
उरलेल्या मिठाईचे गोड पराठे
घरात कोणत्याही प्रकारची मिठाई उरली असेल तर तिचा वापर करून गोड पराठे तयार करता येतात. यासाठी मिठाईचा चुरा करून घ्यावा. त्यानंतर कणकेच्या गोळ्यात हे सारण भरून पराठा लाटून घ्यावा. तव्यावर तूप किंवा तेल लावून पराठा दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यावा. हे गोड आणि चविष्ट पराठे लहान मुलांना विशेष आवडू शकतात.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply