घाटकोपरच्या लालबत्ती हनुमान टेकडी परिसरातील आझादनगरच्या वरच्या बाजूला असलेल्या मोकळ्या डोंगराळ भागात शनिवारी अचानक आग लागली. वाऱ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण डोंगर परिसरात वेगाने फैलाव केला. या घटनेमुळे परिसरातील अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी संबंधित लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला. त्यानंतर अग्निशमन दल आणि मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधून आग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच परिसरातील कचरा हटविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वाहनांना अडथळा; आग आटोक्यात आणण्यात अडचणी
आग विझविताना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आझादनगर परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी झालेल्या कथित अनधिकृत बांधकामांमुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण झाले. डोंगराळ भागात अग्निशमन दलाची वाहने पोहोचणे आधीच कठीण असताना रस्त्यावरील अडथळ्यांमुळे आग वेळेत आटोक्यात आणण्याचे आव्हान अधिक वाढले.
जलवाहिनी-हायड्रंट यंत्रणेची मागणी
या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका सभेत हा प्रश्न ठामपणे उपस्थित करून प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी करणार असल्याचे नगरसेवक किरण लांडगे यांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे संबंधित विभागांच्या संयुक्त कारवाईतून हटवून रस्ते मोकळे करण्याची मागणीही करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अग्निशमन दलाची वाहने पोहोचू शकत नसलेल्या डोंगराळ भागांमध्ये विशेष जलवाहिनी आणि हायड्रंट यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात आगीची घटना घडल्यास तातडीने पाण्याचा पुरवठा करून आग नियंत्रणात आणणे शक्य होईल. त्यासाठी महापालिकेत विशेष पाठपुरावा करणार असल्याचे नगरसेवक किरण लांडगे यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply