नांदेड जिल्ह्यातील कंधार शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभला आहे. राष्ट्रकूट राजांच्या राजधानीचा गौरवशाली इतिहास असलेले हे शहर आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. शहराला ऐतिहासिक ओळख आहे, धार्मिक महत्त्व आहे, नैसर्गिक आणि स्थापत्यकलेचा अनमोल ठेवा आहे; मात्र या वैभवाचे आर्थिक विकासात रूपांतर करण्यात आजवरच्या लोकप्रतिनिधींना यश आलेले नाही.
भुईकोट किल्ला, जगतुंग समुद्र आणि दर्गा
कंधार शहराला राष्ट्रकूट राजांच्या राजधानीचा गौरवशाली इतिहास लाभला आहे. शहरातील राष्ट्रकूटकालीन भुईकोट किल्ला आजही त्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देत उभा आहे. सुफीसंत हजरत हाजी सय्याह यांच्या दर्ग्यामुळे शहराला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेला जगतुंग समुद्र (तलाव) हे कंधारच्या ऐतिहासिक आणि स्थापत्यवैभवाचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. या वास्तू आणि ऐतिहासिक ठेव्याच्या माध्यमातून कंधारला पर्यटनाच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून देण्याची मोठी संधी आहे. मात्र, या संधीचे सोने करण्यासाठी आवश्यक असलेले नियोजन, पर्यटन सुविधा, प्रसिद्धी आणि पायाभूत विकास यांचा अभाव जाणवतो.
महामार्गापासून दूर राहिल्याने पीछेहाट
शहराच्या विकासातील सर्वांत मोठा अडथळा म्हणजे राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडणी नसणे. महामार्ग हे केवळ वाहतुकीचे साधन नसून व्यापार, उद्योग, रोजगार आणि आर्थिक उलाढालीचे प्रवेशद्वार असतात. एखाद्या शहरातून महामार्ग गेल्यास त्या परिसरात बाजारपेठा, व्यावसायिक प्रतिष्ठाने, वाहतूक व्यवसाय आणि लघुउद्योगांना चालना मिळते. मात्र, कंधारला या विकासाच्या संधीपासून वंचित राहावे लागले आहे. शहरातून राष्ट्रीय महामार्ग जावा, यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रभावी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा झाल्याचे ठोस चित्र दिसून येत नाही. विशेष म्हणजे, लोहा ते मुखेड हा राज्य मार्ग कंधार शहरातून नेण्याची संधी होती. मात्र, हा मार्ग शहरातून न नेता जवळपास तीन किलोमीटर अंतरावरून मुखेड फाटा ते घोडज-शेकापूर असा नेण्यात आला.
उद्योगांचा अभाव आणि तरुणांचे स्थलांतर
कंधार शहरातील आणखी एक गंभीर समस्या म्हणजे उद्योगधंद्यांचा अभाव. शहर आणि तालुक्यात रोजगारनिर्मिती करणारे मोठे उद्योग, प्रक्रिया उद्योग किंवा औद्योगिक वसाहतींचा विस्तार झालेला नाही. परिणामी, उच्चशिक्षित तरुणांपासून अल्पशिक्षित युवकांपर्यंत अनेकांना रोजगारासाठी नांदेड, लातूर, पुणे, मुंबई तसेच इतर मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी नसल्याने तरुणांचे स्थलांतर वाढत आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेला पूरक व्यवसायांची जोड मिळत नसल्याने आर्थिक विकासालाही मर्यादा पडत आहेत.
कंधारमध्ये कृषिपूरक उद्योग, अन्नप्रक्रिया उद्योग, शीतगृहे, डाळ मिल, तेल गिरण्या, फळप्रक्रिया केंद्रे आणि लघुउद्योग उभारण्यास मोठा वाव आहे. तालुक्यातील कृषी उत्पादन, गावरान सीताफळासारखी स्थानिक फळे आणि उपलब्ध मनुष्यबळ यांचा विचार करता प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळेल आणि स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. यासाठी औद्योगिक वसाहतीची निर्मिती, गुंतवणूकदारांना प्रोत्साहन आणि शासकीय योजनांचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे.
मूलभूत सुविधा आणि बाजारपेठेची घडी
शहराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करताना अंतर्गत भागांतील मूलभूत सुविधांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. भीमगड परिसरातील रस्त्यांचा प्रश्न अनेक दिवसांपासून नागरिकांसमोर उभा आहे. तर आसान नगर परिसरात रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात विकासाच्या घोषणा होत असताना उपनगरांतील नागरिकांना मात्र मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे.
कंधारचा भुईकोट किल्ला, जगतुंग समुद्र आणि हजरत हाजी सय्याह दर्गा ही ठिकाणे पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकतात. या ठिकाणांचे संवर्धन, सुशोभीकरण, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा, माहिती केंद्र, मार्गदर्शक व्यवस्था आणि पर्यटन प्रसिद्धी यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याची गरज आहे. ऐतिहासिक वारशाचे जतन करतानाच त्यातून स्थानिक रोजगारनिर्मिती होऊ शकते. पर्यटन वाढल्यास हॉटेल व्यवसाय, वाहतूक, स्थानिक उत्पादने आणि छोट्या व्यावसायिकांना आर्थिक संधी उपलब्ध होतील.
एकेकाळी परिसरातील गावांसाठी महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या कंधार शहराची आर्थिक घडी आता विस्कळीत होताना दिसत आहे. मोठ्या व्यापारपेठेचा अभाव, उद्योगधंद्यांची कमतरता आणि महामार्गाशी थेट संपर्क नसल्यामुळे शहरातील आर्थिक उलाढालीवर मर्यादा आल्या आहेत. सायंकाळनंतर बाजारपेठेत अपेक्षित वर्दळ दिसत नाही. त्यामुळे ‘सातच्या आत घरात’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याची खंत व्यापारी आणि नागरिक व्यक्त करतात. शहरात नव्या व्यावसायिक संधी निर्माण झाल्या, तर बाजारपेठेला पुन्हा उभारी मिळू शकते.
कंधारचा विकास हा केवळ रस्ते आणि नाल्यांपुरता मर्यादित राहता कामा नये. राष्ट्रीय महामार्गाशी जोडणी, औद्योगिक वसाहत, रोजगारनिर्मिती, पर्यटन विकास, आधुनिक बाजारपेठ, कृषिपूरक उद्योग आणि प्रलंबित नागरी सुविधांची पूर्तता या मुद्द्यांवर दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. आमदार, खासदार, नगराध्यक्ष आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून कंधारच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. ऐतिहासिक वारसा असूनही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या कंधारला आता केवळ आश्वासनांची नव्हे, तर ठोस कृतीची गरज आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply