रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

थकबाकीदार विकसकांच्या सदनिकाविक्रीवर निर्बंध येणार

झोपडपट्टी पुनर्वसनातील थकबाकीदार विकसकांवर शिवशाहीने कारवाई सुरू केली आहे. पाच विकसकांकडे ११० कोटींहून अधिक थकबाकी असून त्यांच्या सदनिकाविक्रीवर लीन लावणार आहे.

थकबाकीदार विकसकांच्या सदनिकाविक्रीवर निर्बंध येणार

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवणाऱ्या विकसकांना शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने संक्रमण सदनिका भाड्याने दिल्या आहेत. मात्र संबंधित विकसकांकडून या सदनिकांचे भाडे चुकते केले जात नसल्याने थकबाकीचा आकडा शंभर कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे पाच विकसकांची आर्थिक कोंडी करण्याच्या हालचाली शिवशाहीने सुरू केल्या आहेत. त्यानुसार एसआरए प्राधिकरणाच्या मदतीने थकबाकीदार विकसकांच्या विक्रीवर लीन लावला जाणार आहे. त्यामुळे विकसकांना सदनिका विक्री करण्यावर निर्बंध येणार आहेत.

५,१५८ संक्रमण सदनिका भाडेतत्वावर

शिवशाहीने एसआरए योजना राबवणाऱ्या विकसकांना झोपडपट्टीधारकांची तात्पुरती सोय करण्यासाठी ५,१५८ सदनिका भाडेतत्वावर दिल्या आहेत. त्यापैकी पाच विकसकांनी गेल्या सात-आठ वर्षांपासून शिवशाहीला भाडेच भरलेले नाही. त्यामुळे मूळ भाडे, व्याज आणि वार्षिक वाढ अशी थकबाकीची एकूण रक्कम ११० कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. ही रक्कम भरण्यासाठी सवलत द्यावी, अशी विकसकांनी मागणी केली होती. त्यानुसार व्याज आणि भाडेवाढीत कपात करून भाडे भरण्यासाठी सवलत योजना जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार केवळ एकाच विकसकाने थकीत रक्कम भरली असून, उर्वरित पाच विकसकांकडे थकबाकी कायम आहे. त्याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही विकसकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे विकसकांची आर्थिक कोंडी करण्याचा निर्णय शिवशाहीने घेतला असल्याचे शिवशाहीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यानुसार थकबाकीदार विकसकांचे मुंबईत ज्या ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत, त्यामध्ये तयार होणाऱ्या सदनिकांच्या विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी लीन लावण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे थकीत भाड्याच्या वसुलीला चालना मिळेल, असे शिवशाहीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

थकबाकीदार विकसक

ओमकार रियल्टर्स यांच्याकडे ६८ कोटी रुपये, हलकार बिल्डर्स यांच्याकडे २२ कोटी ६८ लाख रुपये, विजय कमल प्रॉपर्टी यांच्याकडे १२ कोटी ५४ लाख रुपये, एस. के. कार्पोरेशन यांच्याकडे १५ कोटी ७० लाख रुपये आणि विन्सवे इन्फ्रा यांच्याकडे ८६ लाख रुपये थकबाकी आहे.

लीन लागणे म्हणजे काय?

विकसकाच्या विक्री घटकांवर लीन लागणे म्हणजे कायदेशीर भाषेत त्या मालमत्तेवर एका प्रकारचा मालकी हक्क किंवा बोजा निर्माण केला जातो. त्याची सरकारी दप्तरी नोंद होत असून, संबंधिताच्या परवानगीशिवाय किंवा त्याची देणी चुकती केल्याशिवाय सदरची मालमत्ता किंवा सदनिकांची विक्री करता येत नाही. संबंधित प्राधिकरणाकडून भोगवटा प्रमाणपत्रही जारी केले जात नाही. जेव्हा एखादा विकासक कर्ज घेतो किंवा इतर कोणाचे देणे लागतो आणि ते फेडण्यास अपयशी ठरतो, तेव्हा कर्ज देणारी संस्था किंवा न्यायालय त्या विकसकाच्या विक्रीसाठी असलेल्या मालमत्तांवर लीन लागू करते.

स्रोत: मूळ बातमी

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance